मागील काही दिवसांपासून कोणत्याही कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्तपदी तथा इतर विभागांच्या सहायक आयुक्तपदी वर्णी न लागलेल्या अलका ससाणे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे. एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र उबाळे यांना बाजूला करत या जागी अलका ससाणे यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे या विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या महेंद्र उबाळे यांना पदाविना ठेवण्यात आले आहे.
( हेही वाचा : आदित्य ठाकरेंना होतंय चुकीचे मार्गदर्शन? )
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या स्वाक्षरीने १३ जानेवारी २०२३ रोजी सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांची बदली एम पूर्व विभागात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून महेंद्र उबाळे यांनी या विभागात चांगल्याप्रकारे कामगिरी केली होती. तरीही त्यांची बदली करण्यात आल्याने अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या एच- पूर्व प्रशासकीय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची ११ नोव्हेंबर २०२२ रोजी बदली कांदिवली आर- दक्षिण विभागात करण्यात आली होती. त्यानंतर तीनच दिवसांमध्ये त्यांचे बदली आदेश रद्द करून त्या विभागाच्या सहायक आयुक्तपदी घनकचरा व्यवस्थापनाचे परिमंडळ सात चे अधिकारी ललित तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांच्या कारकिर्दीत अलका ससाणे या एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त असताना त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीनंतर त्याची बदली केईएम रुग्णालयात करण्यात आली होती. तिथे काही महिने सेवा बजावल्यानंतर ससाणे यांची बदली भायखळा ( ई) विभागाच्या सहायक आयुक्त पदी करण्यात आली होती. तिथून त्यांची बदली एफ उत्तर विभागात करण्यात आली होती, तिथून मग एच पूर्व विभागात करण्यात आली होती. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे कुर्ला एल विभागाच्या सहायक आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु ससाणे यांच्यावर शिवसेनेचा छाप असल्याने त्यांची कांदिवली आर दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु तेथील बदली आदेश रद्द करण्यात आल्यानंतर तेव्हापासून त्यांना कोणत्याही प्रशासकीय विभाग तथा खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती.
Join Our WhatsApp Community