राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयाच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा आणि सून यांच्यावर कुर्ला पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परदेशात जाण्याकरीता व्हिसासाठी बोगस विवाह प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराज मलिक आणि हँमलिन असे गुन्हा दाखल झालेल्या नवाब मलिक यांच्या मुलाचे आणि सुनेचे नाव आहे. फराज मलिक हा यापूर्वी देखील अनेक वादात अडकलेला असून यापूर्वी देखील त्याच्यावर कुर्ला पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र मंगळवारी रात्री दाखल झालेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून या गुन्ह्यात फराज आणि त्याच्या पत्नीला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
फराज मलिक याने फ्रान्स देशाची नागरिक असणाऱ्या हँमलिन हिच्यासोबत विवाह झाला आहे. फराज आणि त्याच्या पत्नीला परदेशात जाण्यासाठी त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्याने विवाह प्रमाणपत्र जोडले होते, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा पासपोर्ट विभागाकडे त्याने जोडलेले कागदपत्रे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या कागद पत्रासोबत जोडलेले विवाह प्रमानपत्राबाबत विशेष शाखेच्या अधिकारी यांनी महानगर पालिकेच्या एल कार्यालयाशी संपर्क साधला असता हे विवाह प्रमाणपत्र आम्ही दिलेले नसल्याचे विशेष शाखेच्या अधिकारी यांना संबंधित मनपा अधिकारी यांना माहिती दिली.
हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस येताच विशेष शाखेच्या अधिकारी यांनी मंगळवारी कुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेऊन फराज मलिक आणि त्याची पत्नी हँमलिन या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली, अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी दिली.
याप्रकरणी फराज मलिक आणि त्याची पत्नी हँमलिन या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) ४६५, ४६८,४७१(बोगस दस्तावेज) ३४(सह) आणि कलम १४ विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, होवाळे यांनी दिली.