लोकप्रिय वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंतिम संस्कार करण्यात आले. मंगळवारी (१७ जानेवारी) दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
गणेशोत्सवात आवर्जून वाजणारं ‘चिकमोत्याची माळ..’ हे गाणं त्यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबत संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची लोकप्रियता आजही जशीच्या तशी आहे. मुखर्जी यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वादन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी सहायक म्हणून संगीतकार राजेश रोशन यांच्याकडे सुरुवात केली. ते उत्तम कोंग वादक होते. त्यांचे वडील बंगाली आणि आई महाराष्ट्रीयन होती, पण ते मराठीच बोलायचे. निर्मल यांचे हिंदी, बंगाली भाषांवर प्रभुत्व होते. त्याचबरोबर ते मराठी आणि मालवणी भाषेतही बोलत असत. त्यांचे वडील एक प्रसिद्ध सिनेनिर्माता होते. दादरमध्ये त्यांचा बसंती म्युझिक हॉल होता. ज्यामध्ये अनेक संगीतकार-वादक रेकॉर्डिंगपूर्वी सरावासाठी येत असत. याच कालावधीत निर्मल यांच्यावर संगीताचा प्रभाव पडला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते म्युझिक असोसिएशनचे सदस्य बनले होते. त्यांनी दहाव्या वर्षी हजरा सिंग यांच्या टीमसोबत वादनाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या टीममध्ये आपले स्थान निर्माण केले होते.
( हेही वाचा: ‘या’ प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची होणार चौकशी )
अनेक दिग्गज संगीतकारांसोबत केले काम
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशिवाय पंचमदा, राजेश रोशन, कल्याणजी-आनंदजी, अनू मलिक, जतिन-ललित ते थेट विशाल-शेखर आदी संगीतकारांकडे त्यांनी बोंगो, कोंग, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशी वाद्ये वाजवली आहेत. सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकूमत होती. अरविंद हळदीपूर यांच्याबरोबर एक होती वादी, झाले मोकळे आकाश या मराठी चित्रपटांबरोबच यही है जिंदगी या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. अरविंद-निर्मल या नावाने ते संगीत देत असत. त्यांनी काही अल्बमही काढले. त्यांनी ‘गणपती आले माझे घरा’ या अल्बमसाठी संगीतबद्ध केलेले ‘अशी चिकमोत्याची माळ’ गीत खूप गाजले होते. ‘एक होती वादी’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
दरबुका वाद्य वाजवण्यात पारंगत
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या एका दुबईतील शोसाठी ते गेले होते. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लेबानिझ नर्तिका आणि वादकांकडे एक अनोखे वाद्य पाहिले. त्या वाद्याचे नाव दरबुका असे होते. रात्रभर त्या वाद्याचे निरीक्षण केले. त्यानंतर ते त्यामध्ये पारंगत झाले होते.
Join Our WhatsApp Community