यापूर्वी देशात सत्तेत असलेल्यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांवर काम करण्याऐवजी सत्तेच्या राजकारणाला महत्त्व दिले. परंतु, आमचे प्राधान्य विकासाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटकात केले. पंतप्रधानांच्या हस्ते केरळच्या यादगिरी जिल्ह्यातील कोडेकल येथे सिंचन, पेयजल आणि राष्ट्रीय महामार्ग विकासाशी संबंधील प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह कर्नाटकातील मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान यादगीरच्या उज्ज्वल इतिहासावर बोलताना म्हणाले की, रत्तीहल्लीचा प्राचीन किल्ला आमच्या पूर्वजांच्या क्षमकांचे प्रतीक आहे. तसेच आमची संस्कृती आणि परंपरा यातून अधोरेखीत होते. यावेळी त्यांनी ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले त्यांच्या भविष्यातील उपयोगावर पंतप्रधान मोदींनी प्रकाश टाकला. तसेच भूतकाळातील कटू अनुभव आणि धोरणांपासून बोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधानांनी उत्तर कर्नाटकातील मागासलेपणावरून पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान म्हणाले की, तत्कालिन सरकार सत्तेच्या राजकारणात व्यस्त होते. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले. याउलट वर्तमानातील सरकार सत्तेच्या राजकारणाहून विकासाला अधिक प्राधान्य देत असल्याचे मोदी म्हणालेत.
त्यासोबतच पंतप्रधानांनी सांगितले की, आगामी २५ वर्षे नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी देश पुढे जात आहे. ही २५ वर्षे देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अमृतकाळ आहे. प्रत्येक राज्यासाठी तो अमृतकाळ असणार आहे. या अमृतमहोत्सवात विकसित भारत घडवायचा आहे. भारताचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य या मोहिमेत सामील होईल. मागील सरकारने मागास घोषित केलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या आकांक्षेला आम्ही प्रोत्साहन दिले आहे. आमच्या सरकारने यादगीरसह देशातील अशा १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम सुरू केला. या जिल्ह्यांमध्ये सुशासनावर आम्ही भर दिला. विकासाच्या प्रत्येक स्तरावर काम सुरू केले. भारताचा विकास करायचा असेल, तर सीमा सुरक्षा, किनारी सुरक्षा, अंतर्गत सुरक्षेप्रमाणंच जलसुरक्षेशी संबंधित आव्हानंही दूर करावी लागतील. त्यामुळेच आमचे सरकार व्होट बँकेच्या राजकारणासाठी नव्हे तर विकासासाठी काम करत असल्याचे पंतप्रधानांन सांगितले.
(हेही वाचा – मुंबईत मोदीच! शिंदे-फडणवीसांचे शक्तीप्रदर्शन)
Join Our WhatsApp Community