विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्रालयासमोरील ‘पावनगड’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पार्थ पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विषयीचा सूर काहीसा बदलेला दिसला. पहाटेच्या शपथविधीवेळची त्यांची ट्विटही चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ते विजनवसात गेल्याचे चित्र होते. अशावेळी सत्ताबदल झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटातील मंत्र्याची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही भेट खासगी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी गोपीचंद पडळकर यांनी याबाबत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
पडळकर काय म्हणाले?
या भेटीबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार हे आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले आहेत. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. त्याशिवाय हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य पार्थ पवारांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचे असेल. पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाही.
Join Our WhatsApp Community