राज्यात अपघाताचे सत्र सुरुच! आता समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जखमी

206

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, १९ जानेवारीला भीषण अपघात झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात ताजा असतानाच आता बुलढाण्यामध्ये आणखीन एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे.

भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

सध्या राज्यात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, बुलढाण्यात झालेल्या या अपघातातील खासगी बसचे राही ट्रॅव्हल्स (बस क्र. MH 20 EL4999) असे नाव होते. ही बस नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसचा अपघात झाला आणि बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. तेवढ्याच मागून भरधाव वेगाने ट्रक आला आणि दोन प्रवाशांना चिरडून गेला. यामध्ये एका प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि दुसरा प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे.

या बस अपघातामध्ये एकूण २१ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व जखमींना देऊळगाव राजा आणि जालनातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांकडून अपघातग्रस्त महामार्गाच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

(हेही वाचा – मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.