आपल्या कडक स्वभावामुळे सातत्याने चर्चेत राहणारे डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना कृषी विभागात नियुक्ती मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले असून, मुंढेंची नियुक्ती रोखण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केल्याचे कळते.
एका वरिष्ठ मंत्र्यांच्या आग्रहाखातर अलीकडेच आरोग्य विभागातून मुंढे यांची उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आपल्या विभागात घेण्यास एकही मंत्री तयार नाही. असे असले तरी एका कार्यक्षम अधिकाऱ्याला इतके दिवस वेटिंगवर ठेवणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या विभागात सामावून घ्यायचे, याबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबते सुरू आहेत.
या सर्व घडामोडींत तुकाराम मुंढे यांना कृषी विभागाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कृषिमंत्र्यांच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशावेळी या खात्याच्या कारभारात पारदर्शकता यावी आणि मंत्र्यांसह त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर अंकुश रहावा, यासाठी मुंढे यांना कृषी विभागात नेमले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
… तेव्हा अवघ्या दोन महिन्यांत बदली
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुकाराम मुंढे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर त्यांना आरोग्य विभागातील महत्त्वाचे पद देण्यात आले. त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांची पाहणी सुरू करीत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे ‘आरोग्य’ सुधारण्यास सुरुवात झाली.
आधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावत असतानाच मुंढे यांनी कोरोना काळातील कामाची माहिती मागविली. त्यानंतर कोरोना काळातील खरेदीची चौकशी करण्याची तयारी सुरू केली. तेव्हापासून त्यांच्या बदलीच्या प्रयत्नांना सुरुवात झाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्याऐवजी खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर आधीपासूनच त्यांच्या रडारवर होते. त्यामुळे कंत्राटदारांच्या लॉबीबरोबरच डॉक्टारांच्या लॉबीनेदेखील आपली ताकद वापरत मुंडे यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले.
कंत्राटदार आणि डॉक्टर लॉबीच्या आग्रहाखातर गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली करण्यात आली. त्यांना आरोग्य विभागात सलगपणे दोन महिनेदेखील काम करता आले नाही. दोन महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. डॉक्टर, कंत्राटदार व राजकारण्यांच्या सोयीसाठी मुंडे यांची बदली झाली, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.
(हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या तोंडावर NCPच्या विक्रम काळेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ, भाजपाचा धरला हात)
Join Our WhatsApp Community