शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी, २० जानेवारी रोजी सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी करत ठाकरे गटाला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी परवानगी देण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली. घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे आहे शिंदे गटाकडे नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वतीने वकील महेश जेठमलानी यांनी केला.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे?
यावर सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. शुक्रवार, २० जानेवारी रोजी ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. ठाकरे गटाच्या वतीने आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी ठामपणे युक्तीवाद केला आहे.
(हेही वाचा ट्विटरचे ब्ल्यू-टिक पाहिजे, तर 11 डॉलर्स मोजा)
काय म्हणाले कपिल सिब्बल?
शिंदे गटाने जर बंड केले होते तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला? राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या. एकनाथ शिंदेंचे प्रतिज्ञापत्र तपासून पहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचे संख्याबळ जास्त आहे. सभागृहांमध्येही आमचे स्थान आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे. त्यात 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत. त्यांचे पक्षांतर्गत काही मतभेद होते तर ती लोकशाहीनुसार म्हणणे मांडायला हवी होती, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला का गेले? राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कोणती कागदपत्रे सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही, असा युक्तिवाद वकील कपिल सिब्बल यांनी केला.
Join Our WhatsApp Community