मुंबई व ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विनापरवानगी कूपनलिका खोदण्यात येत असून या कुपनलिकांमध्ये भूमिगत जलबोगदे अर्थात वॉटर टनेलला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढे कुपनलिकांमुळे टनेल फुटण्याच्या दुर्घटना घडल्यास आता संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने आता हे जाहिर करत संबंधितांना इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी गुंदवलीपासून भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत तलावातील पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जल बोगद्याची व्यवस्था केली आहे.
तसेच, भांडुप संकुल येथून शहर व उपनगरातील विविध सेवा जलाशयापर्यंत व सेवाजलाशयापासून ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगद्याचे जाळे उभारले आहे. यातील भूमिगत जलबोगदा कुपनलिकेचे बांधकाम करता फुटला गेला, त्यामुळे या जलबोगद्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.
मागील काही वर्षात विंधन विहिरी / कूपनलिका खोदताना भूमिगत जलबोगद्यास हानी पोहचून दुर्घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे पाणीपुरवठा बऱ्याच कालावधीकरीता विस्कळीत होतो व नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व रहिवाशी, बांधकाम व्यावसायिक, विकासक सार्वजनिक संस्था, विंधन विहिरी खणणारे कंत्राटदार , विंधन विहिरी खणण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देणारे कंत्राटदार आणि इतर सर्व नागरिकांनी वैयक्तिक अथवा सार्वजनिक कूपनलिका खोदण्यापूर्वी महानगरपालिका तसेच ठाणे महानगरपालिका यांचेकडे असणारी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community