मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे सरकारने कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सातत्याने केले आहेत. आता यात मनसेने एंट्री घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत, कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे हाती लागल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच, ढळढळीत पुरावे असलेली ही कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह आपण 23 जानेवारीला माध्यमांसमोर आणणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
अज्ञात व्यक्तीने ठेवले पुरावे
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आपण कार्यालयात नसताना एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयात येत काही कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह ठेवला. पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे तपासली असता, त्यात कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यांसदर्भात पुरावे असल्याचे समोर आले. या सर्व प्रकारावर आम्ही तीन दिवस रिसर्च केला आणि त्यानंतर आता 23 जानेवारीला या घोटाळ्यांसंदर्भातील पुरावे मी माध्यमांसमोर मांडणार असल्याचे देशपांडे यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वाॅरंट जारी; काय आहे प्रकरण? )
मुंबईकरांची लूट कोणी व कशी केली, त्याचप्रमाणे बॅंक खात्यासंदर्भात सविस्तर माहितीदेखील या पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचा दावा, देशपांडे यांनी केला आहे. कार्यालयात हे पुरावे ठेऊन जाणा-या व्यक्तीचे नाव मात्र समजलेले नाही, परंतु या विरप्पन गॅंगने कोरोना काळात सामान्यांची लूट कशी केली हे आम्ही 23 जानेवारीला माध्यमांसमोर मांडू तसेच, याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरोकडे करणार असल्याचेही देशपांडे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community