राज्यातल्या शासकीय कार्यालयात अनुकूल वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सर्व मंत्र्यांपासून अधिकारी- कर्मचाऱ्यांनी टेलिफोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्याचे शासनादेश जारी करण्यात आले होते. मात्र, सांस्कृतिक विभाग वगळता इतर विभागांना ‘वंदे मातरम्’चे वावडे असल्याचे चित्र आहे. मंत्रालयापासून मंत्र्यांची कार्यालये आणि शासकीय बंगल्यावर फोन केल्यास ‘हॅलो’ कानावर पडतो. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला सरकारकडूनच हरताळ फासला गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम् ने सुरुवात करण्याचे आवाहन केले होते. २ ऑक्टोबरपासून या अभियानाचा शुभारंभ झाला होता. त्यानुसार शासकीय कार्यालयातील टेलीफोनवरून होणारा संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणाऱ्या संवादात ‘वंदे मातरम्’ हे शब्द वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कार्यालयात संस्थांमध्ये येणाऱ्या व्हिजिटर्सनीही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्याची जागृती करावी. विविध बैठका सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करावी, असे शासन आदेशात नमूद केले होते. पण सध्या मुख्यमंत्री कार्यालय,उपमुख्यमंत्री कार्यालय किंवा अन्य मंत्र्याचे कार्यालय असो, कोणत्याही कार्यालयात ‘वंदे मातरम्’ कानावर पडत नाही. मंत्र्यांना मोबाईलवर फोन केल्यास सर्वच जण ‘हॅलो’ने संभाषणाला सुरुवात करतात.
सुधीर मुनगंटीवारांकडे ‘वंदे मातरम्’
या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना फोन केल्यास ‘वंदे मातरम्’ने सुरवात करतात. त्यांच्या शासकीय बंगल्यावर किंवा कार्यालयात फोन केल्यास अधिकारी ‘वंदे मातरम्’ ने संवादाला सुरुवात करतात, पण दुसरीकडे भाजपच्या इतर मंत्र्यांना ‘वंदे मातरम्’चा विसर पडल्याचे दिसून येते.
Join Our WhatsApp Community