जे.जे. रुग्णालय समूहाशी संलग्न असलेल्या कामा रुग्णालयाला नुकताच मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील सर्वात स्वच्छ रुग्णालयाचा पुरस्कार मिळाला आहे. रुग्णालय परिसरातील स्वच्छता, कच-याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करत असल्याने कामा रुग्णालयाला पालिकेने पुरस्कार दिला. ५० हजार रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी २०१९ला कामा रुग्णालयाला शहरातील स्वच्छ रुग्णालयाचा पुरस्कार मिळाला होता.
( हेही वाचा : अमेरिकेने केला एअर स्ट्राईक! सोमालियात अल शबाबचे ३० दहशतवादी ठार)
प्रसूती, नवजात बालकांवर उपचार तसेच कर्करोगांवरील उपचारांसाठी कामा रुग्णालय रुग्णसेवा देते. दर दिवसाला रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दीडशे ते तीनशे रुग्ण भेटी देतात. रुग्णालयातील वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे. पालिका अधिका-यांनी रुग्णालयीन स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात रुग्णालयाला भेट दिली होती. रुग्णालयात दिवसातून तीन वेळा साफसफाई केली जाते. पाण्याच्या टाकीही स्वच्छ केल्या जातात. रुग्णालयात किटक नियंत्रण औषध फवारणीही केली जाते.
रुग्णालयात दर दिवसाला ३५० किलो कचरा जमा होतो. ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करुन रुग्णालयातील बगीच्यात वापरला जातो. सुका कच-याची विल्हेवाट मशीनच्या माध्यमातून केली जाते. आता रुग्णालयात लवकरच रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प सुरु होणार आहे. रुग्णालयातील विहिरीत पावसाचे पाणी साठल्यानंतर याच पाण्याचा वापर करण्याचा निर्णय कामा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. सिटी फॉरेस्ट आणि एचडीएफसीच्या सीएसआर फंडातून ही संकल्पना साकारली जात असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community