वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत गोवरमुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्ययंत्रणा पुन्हा हादरली आहे. अनेक प्रलंबित नमुन्यांचा अहवाल महिन्याभराच्या विलंबाने येत असल्याने राज्यातील गोवर तपासणीची प्रयोगशाळा केवळ आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या घोषणेतच विरली आहे. नोव्हेंबर महिन्यात गोवरची प्रयोगशाळा आठवड्याभरात उभारण्याचे आदेश डॉ. तानाजी सावंत यांनी दिले होते. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही याबाबतीत सकारात्मक हालचाली केली नसल्याची कबुली आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईपाठोपाठ राज्यात गोवरचा उद्रेक होऊ लागला. गोवरच्या वाढत्या संख्येत मुंबई, ठाणे आणि भिवंडीतील बालकांचा मृत्यूही झाला. गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल गुजरात तसेच हैदराबाद येथील प्रयोगशाळांमध्ये राज्य आरोग्य विभागाकडून पाठवला जातो. उद्रेकाची गांभीर्यता पाहता गोवर टास्क फोर्सकडून पुणे किंवा नागपूरात गोवरसाठी प्रयोगशाळा उभारली जावी, असे सूचवले होते. डॉ. तानाजी सावंत यांनी गोवर टास्क फोर्सच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आठवड्याभरात प्रयोगशाळा यंत्रणा उभारण्याची सूचना केली होती. ही सूचना हवेतच विरल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुंबईतील वीसहून अधिक नमुन्यांचा चाचणी अहवाल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाला मिळाला. या केसेस शोधण्याचे मोठे आव्हान आता पालिका आरोग्य विभागासमोर आहे.
जानेवारी महिन्यात दहा दिवसांत मुंबईत दोन बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला. केवळ केसेस कमी झाल्याने गोवर आटोक्यात आल्याचा समज चुकीचा आहे. दोन्ही बालकांचा मृत्यू केवळ पालिका आरोग्य विभागाने नव्हे तर राज्य आरोग्य विभागाने गांभीर्यतेने घ्यावी, या शब्दांत गोवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी समज दिला आहे.
मुंबईत हवी स्वतंत्र प्रयोगशाळा
मुंबईतील गोवरचा उद्रेक पाहता आता मुंबईत गोवरच्या नमुन्यांच्या चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आवश्यक असल्याचा मुद्दा आता गोवर टास्क फोर्स मांडणार आहे. गोवरमुळे पुन्हा मृत्यूसत्र सुरू होत असल्याने आगामी काळात लवकरच बैठक होऊन सकारात्मक पावले उचलली जातील, अशी आशा गोवर टास्क फोर्स सदस्यांनी व्यक्त केली.
गोवर हा गंभीर आजार
नोव्हेंबर महिन्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी एकाच आठवड्यात तीन बैठका घेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना गोवर नियंत्रणात आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. गोवरचा उद्रेक पाहता गोवरला गंभीर आजार असल्याचे घोषित करावे, असाही मुद्दा गोवर टास्क फोर्सने मांडला होता. अद्यापही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा सरकारी अध्यादेश जारी केलेला नसल्याने गोवर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे का?, असा सवालही गोवर टास्क फोर्सने विचारला.
(हेही वाचा – ‘या’ आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदत घ्या)
Join Our WhatsApp Community