भाजपाच्या खेळीपुढे महाविकास आघाडी निष्प्रभ

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक; विधानपरिषदेत बहुमतासाठी धडपड

249

कोणी रातोरात पक्ष बदलतो, कोणी स्वपक्षाविरोधात दंड थोपटतो, तर कोणी तिकीट जाहीर होऊनही माघार घेतो… या आणि अशा अनेक घडामोडींमुळे सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ‘लक्षवेधी’ ठरत आहे. नाशिक, अमरावतीत पदवीधर; तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी ३० जानेवारीला मतदानप्रक्रिया पार पडणार असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

( हेही वाचा : लोकांच्या समस्या दूर करणारे बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री आहेत तरी कोण? )

विधानपरिषदेत बहुमत नसल्यामुळे भाजपाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सभापतीची निवड, लोकायुक्तसारखी महत्त्वाची विधेयके संमत करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधरच्या सर्व पाचही जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी निर्धारित केले आहे. त्यासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतची सर्व पक्षयंत्रणा कामाला लागली आहे. नाशिक पदवीधर, कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात आयत्यावेळी बदलेली राजकीय समीकरणे, हे त्याचेच प्रत्यंतर आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या या पाच मतदारसंघांपैकी नाशिक पदवीधरची जागा भाजपासाठी आव्हानात्मक होती. कॉंग्रेसविरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे पराभव जवळपास निश्चित होता. अशावेळी माघार न घेता भाजपाने कॉंग्रेसलाच सुरुंग लावत मविआचे मनसुबे उधळून लावले. राहुल (गांधी) ब्रिगेडचे खंदे कार्यकर्ते मानल्या जाणाऱ्या सत्यजित तांबे यांना गळाला लावत, भाजपाने ट्वीस्ट आणला. सत्यजित तांबे कॉंग्रेसकडून पदवीधरसाठी इच्छूक होते. तशी इच्छा त्यांनी वरिष्ठांनाही बोलून दाखवली. मात्र, सत्यजित यांनी पदवीधरऐवजी विधानसभा निवडणूक लढवावी, यावर वरिष्ठांचे एकमत झाले. त्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्याचवेळी सत्यजित यांची महत्त्वाकांक्षा हेरत भाजपाने योग्य फासे टाकले आणि डाव पालटला.

कॉंग्रेसने साथ सोडली, तरी संपूर्ण भाजपा, शिंदे गट आणि ‘अदृश्य’ शक्ती पाठिशी उभी करून तुम्हाला जिंकून आणू, असा विश्वास सत्यजित यांना देण्यात आला. त्यामुळेच अपक्ष अर्ज दाखल करत त्यांनी स्वपक्षाला अंगावर घेतले. सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे या मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले असल्यामुळे नाशिक पदवीधरवर त्यांचा प्रभाव आहे. ते स्वतः सत्यजित यांच्या पाठिशी उभे असल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. शिवाय राधाकृष्ण विखे-पाटील यांची फौज आणि भाजपाचा वरदहस्त असल्यामुळे सत्यजित तांबे यांची आमदारकी निश्चित मानली जात आहे.

कोकणात समीकरणे बदलली

कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जायचा. पंरतु, गेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत शिक्षक परिषदेत झालेली बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराने मारलेली मुसंडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा, या जोरावर शेकापने ही जागा हिसकावून घेतली. त्यामुळे गेल्यावेळीचा वचपा काढण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यांच्या सुदैवाने गेल्यावेळी दुसऱ्या स्थानी असलेले शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे शिंदे गटात आल्यामुळे उमेदवार आयात करण्यासाठी कष्ट घ्यावे लागले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या संमतीने भाजपाने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी (कमळ चिन्हावर) जाहीर केली आहे. विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्याशी त्यांची लढत होईल.

औरंगाबादमध्ये जोर कुणाचा?

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपाने किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी कमळ हाती घेतले. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दोन महिन्यांत त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांच्याशी त्यांची लढत होईल. काळे हे २०१० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, यंदा राष्ट्रवादीतच बंडखोरी झाल्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

नागपुरातील स्थिती

नागपुरात भाजपाने स्वतःचा उमेदवार न देता महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या नागो गाणार यांना पाठिंबा दर्शवला आहे. ते तीनवेळा या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. विदर्भ माध्यमिक संघाच्या सुधाकर अडबाले यांच्याशी त्यांची लढत होईल. त्यांना पाठिंबा दर्शविण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. त्याशिवाय शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडेही मैदानात आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होणार असल्याने ना. गो. गाणार यांचे पारडे काहीसे जड वाटत आहे.

अमरावतीत भाजपा विरुद्ध कॉंग्रेस

अमरावतीत भाजपकडून विद्यमान आमदार रणजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात पाटील यांनी गृह आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांच्याशी त्यांची लढत होईल. लिंगाडे हे मूळ शिवसेनेचे उमेदवार म्हणून तयारी करत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या वाटपात अमरावतीची जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे त्यांनी पक्षांतर करीत तिकीट मिळवले. असे असले तरी, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन भारत पार्टीचे आव्हान त्यांच्यासमोर असल्यामुळे भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात आहे.

प्रमुख लढती अशा :

कोकण शिक्षक मतदारसंघ
  • बाळाराम पाटील (शेतकरी कामगार पक्ष )
  • ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजपा)
नाशिक पदवीधर मतदारसंघ
  • सत्यजित तांबे (अपक्ष)
  • शुभांगी पाटील (अपक्ष)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
  • विक्रम काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
  • प्रदीप सोळुंके (राष्ट्रवादी बंडखोर)
  • प्रा. किरण पाटील (भाजप)
  • कालिदास माने (वंचित बहुजन
    आघाडी)
  • सूर्यकांत विश्वासराव (मराठवाडा
    शिक्षक संघ)

अमरावती पदवीधर मतदारसंघ

  • डॉ. रणजित पाटील (भाजप)
  • धीरज लिंगाडे (काँग्रेस)
  • अनिल अमलकार (वंचित बहुजन
    आघाडी)
  • डॉ. गौरव गवई (बहुजन भारत
    पार्टी)
नागपूर शिक्षक मतदारसंघ
  • नागो गाणार (शिक्षक परिषद, भाजप समर्थित)
  • राजेंद्र झाडे (शिक्षक भारती)
  • सुधाकर अडबाले (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मविआ समर्थित)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.