उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. मात्र महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेण्याच्या विषयावर राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये वंचितची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी, असे वक्तव्य केले. यावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता समंजस्याचे राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असे वाटते एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिले. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार, २३ जानेवारी रोजी डॉ. आंबेडकर भवन इथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान दिले जाणार. शेवटी कुणी किती जागा लढायच्या हे अजून ठरवायचे आहे. ते ठरल्यानंतर निर्णय घेऊ. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे नागपूरला सुद्धा अर्ज भरला होता तो मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला सोडली. त्यांनी जे करायचे नाही ते केले. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली त्यांना सोडली होती. तिथे आमचा माणूस नाही असे म्हटले नाही. आता समंजस्याचे राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असे वाटते एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये. अडीच तीन वर्षांपूर्वी आम्हाला गृहीत धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. त्यावेळी मला सांगितले की, शरद पवार यांचा लौकीक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील, हे मी जाहीर भाषणात सांगितले. हे मी पाहत असताना माझ्याच लोकांनी दगा दिला. दुसऱ्याचे घर फोडून सत्तेत येणारी अवलाद गाडून टाकण्याची गरज आहे. तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, आमच्यावर अनेक आरोप झाले. पण आम्ही सगळ्या आरोपांना उत्तरे दिली. आम्ही अडीच वर्ष सरकार चालवून दाखवले. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांचे हित सांभाळायचे, जर आपण एकत्र आलो नाही तर व्यक्तिरित्या काही फायदा होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community