शिवसेना नेते आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे मागील दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात सहभागी झाले. एका बाजूला आपला पक्ष अडचणीत असताना राऊत हे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होत असल्याने संजय राऊत यांना राष्ट्रीय नेता होण्याचे मोठे स्वप्न असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा स्वत:चे व्यक्तिमत्व मोठे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानांत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न राऊत यांच्याकडून सुरु असल्याने भविष्यात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे राऊत हेच प्रमुख आव्हान ठरण्याची भीती वर्तवली जात आहे.
( हेही वाचा : .. तर सावरकरांबाबत अतिशय नीच, निम्न शब्दांत बोलणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा द्यावा; मुनगंटीवारांकडून विरोधकांना प्रत्युत्तर )
शिवसेना नेते संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार म्हणून परिचित असले तरी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाची पूर्णपणे धुरा उध्दव ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर राऊत हेही पक्षात मोठ्याप्रमाणात सक्रिय होऊ लागले.पक्षाचे नेते आणि मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. सन २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपने युतीत जागा लढवल्यानंतरही भाजपपासून शिवसेनेला बाजुला करत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी बनवून त्यांचे सरकार स्थापन करण्यासाठी राऊत यांनी मोठी मध्यस्थी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मानस पुत्र म्हणून राऊत यांची ओळख असल्याने त्या ओळखीचा फायदा महाविकास आघाडी बनवण्यासाठी झाला आणि पवारांच्या सांगण्यानुसार राऊत यांनी उध्दव ठाकरे यांचे मन वळवले होते, असेही बोलले जात होते.
शरद पवारांशी असलेली मैत्री आणि पवारांच्या मदतीने आता त्यांनी काँग्रेससोबतही घट्ट मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापूर्वी दिल्लीतील सर्व पक्षीय सभेमध्ये शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत हे उपस्थित राहिले होते आणि त्यावेळी राहुल गांधी यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी काढलेले फोटो प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो अभियानची रॅली आली होती, त्यावेळी राऊत हे जाऊ शकले नव्हते, त्यामुळे शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे उपनेते सचिन अहिर यांच्यासमवेत उपस्थित राहिले होते.
परंतु ईडी प्रकरणात अटक होऊन सुटका झालेले संजय राऊत हे पुन्हा एकदा पक्षाच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भारत व पाक सीमेवर जाऊनही आले. विशेष म्हणजे एका बाजूला शिवसेना पक्ष महाविकास आघाडीत असला तरी काँग्रेस पक्षासोबत त्यांचे काही सूत जुळताना दिसत नाही. त्यामुळे संजय राऊत हे थेट पक्षश्रेष्ठीशी जवळकी वाढवून महाराष्ट्रात काँग्रेसला शिवसेनेसोबतच आघाडीत राहण्याचा सूचना देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलत आहे. शिवसेनेचे सर्व नेते उध्दव ठाकरे यांच्या सूचनेशिवाय तोंडातून एक अक्षरही काढत नाही. परंतु शिवसेना पक्ष उध्दव ठाकरे नव्हे तर आपणच चालवत असतो अशाप्रकारचे वातावरण राऊत यांच्याकडून कायम निर्माण केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून थेट राष्ट्रीय स्तरावर नेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी राऊत हे काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्यासोबतही त्यांनी मैत्री निर्माण केली आहे. शिवसेनेचे नेते म्हणून ते या पक्षांशी जोडले जात असून एकप्रकारे ते राष्ट्रीय नेत्याची स्वप्ने पाहत असतानाच उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा आपण मोठे होण्याचीही स्वप्ने पाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राऊत यांच्यापासून भविष्यात उध्दव ठाकरे यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. शरद पवारांशी निर्माण केलेल्या नात्याच्या आधारे ते केंद्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करून शिवसेनेला भविष्यात धोका निर्माण करू शकतात असेही काहींचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community