शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सर्वत्र कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. ठिकठिकाणी त्यांचे होर्डिंग लागले आहेत. गेल्या तीन, सव्वा तीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुह्रदयसम्राट असे लिहिले गेले आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
वारसा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो
बाळासाहेबांनी शेकडो लोकांना येथे पाठवले, अशा या वास्तूमध्ये बाळासाहेबांची आणखी दोन तैलचित्रे असावीत, त्यातील एक विधानसभेत आणि दुसरे विधानमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ लावावे, जेणेकरून आपण इथवर कसे आलो, हे इथे येणाऱ्या आमदारांना कळावे, अशी इच्छा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. मला बाळासाहेबांचा लहानपणापासून सहवास लाभला आहे. स्वतः बाळासाहेब गाडी चालवून मला शाळेतून घेऊन जात होते. घरातला व्यक्ती, व्यंगचित्रकार आणि पक्षाप्रमुख असे बहुअंगी व्यक्तिमत्व मी पहिले आहे. वारसा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, माझ्याकडे जे आले तो विचारांचा वारसा आला, असे राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण; उद्धव ठाकरे अनुपस्थित, राज ठाकरेंची हजेरी)
बाळासाहेब कट्टर मराठी, हिंदुत्ववादी
हा माणूस कुठच्या विषयांमध्ये मुलायम होता आणि कोणत्या विषयात कडवट होता, हे मला नीट समजले. कृती घडत असताना संस्कार वेचायचे असतात, ते संस्कार मी वेचत आलो. मी कडवट मराठी घरात आणि कडवट हिंदुत्ववादी घरात जन्मलो आहे. हा माणूस घरात आणि बाहेर वेगळा असे कधीच नव्हता. १९९९ची विधानसभेची निवडणूक होती, तेव्हा काही कारणासाठी भाजपासोबतची युती अडत होती, दुपारच्या वेळी दोन गाड्या आल्या, त्यातून प्रकाश जावडेकर आणि भाजपचे आणखी दोघे जण आले, त्यांनी मला बाळासाहेबांना भेटायचे असे सांगितले. मी म्हटले त्यांची झोपायची वेळ आहे, मात्र ते म्हणाले आज आपले सरकार बसते आहे, त्यामुळे भेटायचेच आहे. त्यांनी मला सांगितले की, ‘सुरेशदादा जैन युतीचे मुख्यमंत्री असतील आणि सरकार बसते आहे’, असा निरोप बाळासाहेबांना द्या. मी त्यांचा निरोप बाळासाहेबांना दिला, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कुणी असणार नाही. त्याचवेळी मला कळले, या माणसाने मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली.
बाबरी मशीद पडली होती, तेव्हा मी मातोश्रीतच होतो, दीड-दोन तासांनी माध्यमांकडून फोन आला, त्यांनी विचारले बाबरीची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही. भाजपावाले म्हणतात, तिथे शिवसैनिक असतील, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘ते शिवसैनिक असतील तर मला अभिमान आहे.’ हिंदुत्वाची जबाबदारीही घेणारे बाळासाहेब होते. बाळासाहेब विनोदी होते, त्यांचे विनोद सांगताही येणार नाहीत. विलक्षण व्यक्तिमत्व मी पाहत आलो. त्यांच्या सोबतच्या गोष्टी मी पाहू शकलो म्हणून स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो. त्यामुळे यश आले म्हणून हुरळून जात नाही आणि अपयशाने खचून जात नाही. त्यांच्यावर फोटो बायोग्राफी तयार केली. तिच माझी त्यांना श्रद्धांजली आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community