बाळासाहेबांच्या जीवनातील गणित राजकीय बेरजेची नव्हती, राजकीय बेरजेकरता त्यांनी कधीही राजकारण केले नाही. तत्वासाठी त्यांनी राजकारण केले म्हणूनच संपूर्ण देशात त्यांच्या नेतृत्त्वाला मान्यता मिळाली, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेबांविषयी सांगताना फडणवीस म्हणाले, ‘महासागरासारखे बाळासाहेब होते. प्रसंगी अतिशय शांत आणि आवश्यक असेल तेव्हा तुफानपेक्षाही संघर्ष करणारे, त्यांचे व्यक्तिमत्त्व अथांग होते. बाळासाहेबांचं तैलचित्र जरूर लागलं आहे परंतु त्यांना या सभागृहात येण्याचा मोह कधीही झाला नाही. छगन भुजबळ यांनी पक्ष बदलला तेव्हा राज ठाकरेंनी तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांचे कार्टुन काढले. त्यावेळी आर. आर. पाटील यांनी हक्कभंग आणला तेव्हा हक्कभंग समितीने कार्टुन काढणारा कोणीही असो, मुख्य संपादकांना बोलावलं पाहिजे असा निर्णय घेतला. बाळासाहेब हे तत्वाने चालणारे असल्याने तसेच त्यांचा लोकशाहीवर विश्वास असल्याने बाळासाहेब हक्कभंग समितीपुढे गेले. तेव्हा त्यांचं या विधानसभेत येणं झालं. तेव्हा तुम्ही गोडं खाता का? असा प्रश्न बाळासाहेबांना विचारण्यात आता, त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, मी पैसे सोडून सगळं खातो. समितीने बाळासाहेबांना शिक्षा दिली परंतु नंतर ही शिक्षा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी विनंती केल्यानंतर मागे घेण्यात आली.’
बाळासाहेब नेहमीच स्पष्ट बोलायचे – फडणवीस
बाळासाहेबांकडे मनाचा मोठेपणा होता तो त्यांच्या विरोधकांनी सुद्धा अनुभवला. म्हणूनच समाजातील सर्व स्तरांमध्ये बाळासाहेबांविषयी आत्मीयता आणि आपुलकी होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते ‘I am mad Hindu’ ते नेहमीचं स्पष्ट बोलायचे. राजकारणात असे फार कमी लोक असतात ज्यांना एकदा बोलल्यावर ते वाक्य परत घेण्याची वेळ येत नाही. बाळासाहेब एकदा म्हणाले की, ती काळ्या दगडावरची रेघ असायची मग त्याचे काहीही राजकीय परिणाम होऊ द्या. त्यांनी एकदा दिलेला शब्द कधीही मागे घेतला नाही. बाळासाहेबांच्या जीवनातील गणिते राजकीय बेरजेची नव्हती. राजकीय बेरजेकरता त्यांनी कधीही राजकारण केले नाही. तत्वासाठी त्यांनी राजकारण केले म्हणूनचं संपूर्ण देशात त्यांच्या नेतृत्त्वाला मान्यता मिळाली आणि अनेक तरूण त्यांच्यामागे वेडे झाले. बाळासाहेबांनी कधीही जात-पात पाहिली नाही, महाराष्ट्राच्या राजकारणातील जातिव्यवस्थेचा पगड्याला पराभूत करण्याचे काम बाळासाहेबांनी केले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मध्यवर्ती सभागृहात येणारा प्रत्येक सदस्य बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेईल
बाळासाहेबांसारखा नेता हा कायम हवाहवासा वाटतो. त्यांच्या विचारांचे धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे जी प्रखरता बाळासाहेबांनी आपल्याला शिकवली आहे ही प्रतिबद्धता कायम आपल्यासोबत राहणं हीच त्यांच्या विचारांना श्रद्धांजली असणार आहे. मध्यवर्ती सभागृहात येणारा प्रत्येक सदस्य बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेईल अशी मला आशा आहे. मराठी माणसाच्या भल्याकरता आणि या देशामध्ये हिंदुत्त्वाचा हुंकार टिकला पाहिजे याकरता निश्चितपणे प्रत्येक व्यक्ती ही बाळासाहेबांकडून प्रेरणा घेईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community