मंगळवारी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण म्हणजे आदळाआपट थयथयाट आणि नृत्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी सुरक्षित राहिल्या याचे कारण भारतीय जनता पक्षाने पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली हे आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही. गेल्या २५ वर्षातील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे मूल्यमापन करायचे झाल्यास मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. या डाकूंपासून मुंबईला मुक्तता देणं हे भारतीय जनता पक्षाचे मिशन आहे, अशी सडकून टीका करत मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शरसंधान साधले.
एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे
‘आम्ही पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजीसारखी चालवली. मी, शेठजी यासाठी म्हणतो की त्यांनी कामे केली ती धनदांडग्या शेठजीसाठी. मग कधी ताजला सूट द्या, बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट द्या, कधी डिस्कोसारख्या बार मालकांना सूट द्या, ठेकेदारांना सूट द्या, काल स्वतः तेच म्हणाले की, ते ठेकेदारांचे पैसे आहेत. ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकुपासून मुक्त करणे यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आहे. वैचारिक स्वैराचाराचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकीय जीवन आहे. मला व्यक्तिगत जायचे नव्हते पण त्यांनी आमचे बापजादे काढले त्यामुळे आज मला बोलावे लागत आहे. एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे. ते स्वतःच्या कुटुंबातील बंधू, चुलत बंधू यांनाही ते एकत्र ठेवू शकले नाहीत. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झाले. स्वतःच्या पक्ष ते एकत्रित ठेवू शकले नाहीत. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. स्वतःचा पक्ष, स्वतःचे कुटुंब त्यानंतर सरकार तेही ते एकत्र ठेवू शकले नाहीत’, असे शेलार म्हणाले.
दावोसमधील कराराचे आकडे बघून संजय राऊतांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली
पुढे आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. तेव्हा ते म्हणाले की, ‘संजय राऊत यांना इंग्रजी तरी येते का? त्यांनी इंग्लिशमध्ये एखादे वाक्य बोलून दाखवावे. एखादे भाषण करून दाखवावे. त्यामुळे स्वतःला जमत नाही त्याबाबत दुसऱ्याला दिशादर्शन करणे हे काही बरोबर नाही. मी, आज त्यांना विचारणार नाही की, उद्धवजी इंग्लिशमध्ये बोलू शकतात का? पण मुद्दा असा आहे की, जे स्वप्नामध्ये बायडन आणि कृशोवला भेटतात त्यांना सगळेच स्वप्नामध्ये भेटतात असे वाटत असेल. दावोसमधील करारामध्ये झालेले आकडे बघून त्यांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली म्हणून असे हास्यास्पद संजय राऊत बोलतात.’
भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित- वंचित आघाडी
‘कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे.’ राज्यपालांवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘त्यांनी मोर्चा काढला होता त्याचे काय झाले? त्यांनी आंदोलन केले होते. जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपाल यांनी केले आहे. ते आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य आहे.’
म्हणून उद्धवजी कार्यक्रमाला आले नाहीत
तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित न राहिल्याबाबत शेलार म्हणाले की, ‘मला वाटते हा कार्यक्रम अराजकीय होता. त्यांच्याही पक्षाचे लोक होते. उद्धवजी स्वतः आले नाहीत. ते स्वतः मात्र अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर गुलूगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचे राजकारण पाहत आहेत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांच्या भगवाधारी तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर मिळतील की, नाही यासाठी एका विशिष्ट गटाच्या मताचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धवजी कार्यक्रमाला आले नाहीत असा आमचा कयास आहे.’
मुंबईचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील
‘मुंबईच्या प्रदूषणाबद्दल आम्ही चिंतेत आहोत. विशेषतः लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिक यांना त्याचा जोरदार फटका बसत आहे. या सगळ्यावर मी, राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. महापालिका त्यावर काही करेल या अपेक्षेने आम्ही वाट पाहिली. आम्ही राज्य सरकारला याबाबत विनंती केली आहे. या सर्वांबाबत माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली आहे की, याला कारण बांधकाम व्यवसायातून उडणारी धूळ आहे. गेल्या दीड दोन वर्षांमध्ये बिल्डरांना प्रीमियममध्ये, स्टॅम्प ड्युटीमधे सूट दिली परिणामी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक कामे बाहेर काढली. कोरोनानंतर एकदम सर्व बांधकामे सुरू झाल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या कामावर योग्य ठिकाणी मर्यादा आणणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी धूळ उडते त्या ठिकाणी रस्ते धुण्याची आवश्यकता आहे. हवेची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी समिती नेमण्याची गरज आहे. अशा सर्व पद्धतीच्या सूचना मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही दिलेल्या आहेत’, असे आशिष शेलारांनी स्पष्ट केलं.
(हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – देवेंद्र फडणवीस)
Join Our WhatsApp Community