अर्ध्या मुंबईत येत्या ३० आणि ३१ जानेवारीला पाणीबाणी

229

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती जाणार आहेत. त्यामुळे ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत मुंबईतील १२ विभागात पाणी पुरवठा बंद; तर दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तर२९ जानेवारी ते दि. ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने या कालावधी दरम्यान पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे महापालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी  केले आहे.

महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात.

कामांच्या अनुषंगाने ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती माळवदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना माळवदे यांनी सांगितले की, पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. याव्यतिरिक्त ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

मुंबईतील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक  सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे २९ जानेवारी २०२३ तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान महानगरपालिकेच्या वरील विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी कृपया पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.