देशाची सुरक्षा तीन भागांत विभागली जाते. देशाची बाह्य सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि अंतराळ सुरक्षा. देशाच्या बाह्य सुरक्षेत सीमा सुरक्षा आणि समुद्री सुरक्षेचा समावेश होतो. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत कश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवाद अथवा माओवाद, बांग्लादेशी घुसखोरी तसेच, ईशान्य भारतात चीनकडून होणाऱ्या बंडखोरीला रोखणे किंवा अफू, गांजा, चरसच्या माध्यमातून पसरवला जाणारा दहशतवाद यांचा समावेश होतो. तसेच अंतराळातील धोकादायक कृतींना आळा घालण्यासाठी आणि शत्रू देशाकडून अंतराळातून केल्या जाणाऱ्या कारवायांवर प्रतिबंध करणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतराळ सुरक्षेत केला जातो. या तीनही सुरक्षांच्या बाबतीत भारताचे संरक्षणाचे धोरण कसे असावे, ते जाणून घेऊया.
( हेही वाचा : हैदराबादमध्ये ‘मॉडेल कॉरिडोर’! सायकल ट्रॅक पादचारी मार्गासह, वीजनिर्मितीसाठी सौर छताची सुविधा )
भारताची बाह्य सुरक्षा
भारताची बाह्य सुरक्षा भारतीय लष्कराकडून केली जाते. त्यांना नौदल आणि हवाई दल साथ देत असते. भारताचा आताच्या घडीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चीन आणि त्यानंतर पाकिस्तान. पाकिस्तानची भारतावर लष्करी हल्ला करण्याची हिंमत नाही, किंबहुना ताकद नाही. परंतु चीन मात्र सीमाभागांवर येत्या काळात देखील घुसखोरी चालूच ठेवणार आहे. त्यामुळे भारताला सीमाभागांवरील लष्करी टेहाळणी अधिक मजबूत करावी लागणार आहे. त्यासोबतच, गस्त घालणे,ड्रोन आणि सॅटेलाईटच्या माध्यमातूनदेखील पाहाणी करावी लागणार आहे. पाकिस्तानबाबत बोलायचे झाले तर पाकिस्तान सीमेलगतच्या भागांतून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानच्या या घुसखोरीला भारतीय लष्कर वेळोवेळी सडेतोड उत्तर देत असतेच, परंतु भारताची आंतरराष्ट्रीय सीमा मात्र अजिबात सुरक्षित नाही. या सीमाभागांतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची भारतात तस्करी केली जाते. बनावट नोटाही मोठ्या प्रमाणात भारतात आणल्या जातात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ला येणाऱ्या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
भारताची सागरी सुरक्षा
भारताच्या समुद्री मार्गाने अफू, गांजा, चरस या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी, आखाती देशांसोबत बेकायदेशीर व्यापार तसेच २६/११ ला ज्याप्रमाणे समुद्री मार्गाचा वापर झाला तसा भविष्यात होण्याची शक्यता, सागरी सीमांमध्ये होणारी अवैध मासेमारी हे सर्व धोके थांबवण्याकरता भारताचे तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि सागरी पोलीस यांना दक्षता घेण्याची गरज आहे.
अंतराळ सुरक्षा ( स्पेस सिक्युरिटी)
भारताची अंतराळ सुरक्षा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (आयडीएस) अंतर्गत येते. अंतराळातून शत्रू देश आपल्यावर टेहाळणी करु शकतो, तसेच आपल्या सॅटेलाईटला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे शत्रू देशाच्या या कारवायांवर लक्ष ठेऊन देशाची अंतराळ सुरक्षा कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
सायबर सुरक्षा
चीनसारखे शत्रू देश भारतावर सायबर हल्ले करत असतात. येत्या काळात ते अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला सायबर रक्षात्मक पद्धती निर्माण करावी लागेल. इतकेच नाही तर, गरज भासल्यास चीन, पाकिस्तानसारख्या देशांवर सायबर सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमतादेखील भारताला निर्माण करावी लागेल. चीन ज्याप्रमाणे भारतात अपप्रचार पसरवत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण चीनमध्ये दुष्प्रचार किंवा माहिती युद्ध करु शकत नाही. कारण चीनमध्ये ट्वीटर, फेसबूक अशा सोशल मीडिया अॅप्सना परवानगी नाही. त्यामुळे चीनच्या बाहेर जे काही चीनी नागरिक आहेत त्यांच्याद्वारे भारताला ही घुसखोरी करावी लागेल.
येणाऱ्या काळात युद्धपद्धती वेगाने बदलण्याची शक्यता आहे किंबहुना ती बदलत आहे. त्यामुळे शत्रू देश कोणत्या युद्धपद्धतीचा वापर करतात, त्यानुसार भारताला सजग राहून, स्वत: ला आधुनिक युद्धासाठी सक्षम करावे लागणार आहे. असे झाले तरच भारताचे सुरक्षा धोरण यशस्वी होणार आहे.
भारताबाबत अपप्रचार युद्ध
भारतवासियांच्या मनाची सुरक्षा, त्यांच्या माहितीची सुरक्षा यांचा या सुरक्षेत समावेश होतो. भारताबाबत अनेक देश खास करुन चीन आणि पाकिस्तान आणि त्यांचे हस्तक अपप्रचार करतात. अशावेळी भारतीयांची मने आपल्याच देशाबाबत मलिन करण्याचा शत्रू देशांचा डाव असतो. त्यामुळे भारताला येत्या काळात दुष्प्रचार युद्धाबाबत तयार राहण्याची गरज आहे. भारतीयांच्या मनात शत्रू देश अनेक मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीयांच्या सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रीक मीडिया यांच्या माध्यमातून देशाविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. ही घुसखोरी प्रामुख्याने भारतीय सैन्य, भारत सरकार, भारतीय नागरिक यांच्याविरोधात केली जाते. या अपप्रचाराचा फारसा फरक भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्यावर होत नाही. परंतु भारतीय नागरिकांच्या मनात मात्र देशाविषयी असुरक्षितता निर्माण केली जाते. तसेच, या देशाला भवितव्य नसल्याचे भासवले जाते. त्यामुळे भारतीय नागरिकांचा भारताच्या सरकारवर, सैन्यावर विश्वास असावा, यासाठी योजना आखणे गरजेचे आहे. देश विरोधात आलेली माहिती पुढे पाठवु नये.