मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या वतीने मेट्रो ३ च्या स्थानकांच्या कामांमुळे बाधित झालेल्या झाडांचे त्यांच्या मूळ जागी वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला सिप्झ स्थानकापासून बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यावेळी मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकिय संचालक आश्विनी भिडे यांच्या हस्ते सिप्झ मेट्रो स्थानकांतील इलेक्ट्रॉनिक्स प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा परिसरात या मोहिमेचा प्रारंभ झाला. ‘मूळ जागी वृक्षरोपण करण्याच्या मोहिमेला सुरूवात करून एकप्रकारे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल मुंबई मेट्रोने टाकले आहे.
मेट्रो-३ मधील २६ स्थानकांच्या बांधकामादरम्यान साधारण ३००० झाडे बाधित झाली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे मुं.मे.रे.कॉ. हे राज्यातील विविध बागांमध्ये १८ इंच परिघ असलेली तितकीच झाडे रुजवत असून मेट्रो स्थानकांच्या त्याच परिसरात मूळ जागी त्याला पुनर्स्थापित करत आहेत. या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात वृक्षारोपणातील पॅकेज १९ पासून करण्यात आली आहे. याअंतर्गत सिप्झ ते धारावीपर्यंतच्या १० स्थानकांचा समावेश होतो. पॅकेज १९ अंतर्गत देशी बदाम, ताम्हण (फुल) आणि पांगारा (फुल) प्रजातींसह १७ स्थानिक प्रजातींची एकूण १०८५ झाडे लावली जातील.
‘मूळ जागी वृक्षरोपण मोहिमेला सुरूवात करून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत असल्याचा मला आनंद होत असल्याचे यावेळी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत पुढील ३ वर्षांमध्ये बागेत रुजवलेली जवळपास ३००० हजार झाडे मेट्रो स्थानकांच्या परिसरात लावून त्यांची तीन वर्ष देखरेख तथा देखभाल कॉर्पोरेशन द्वारे केली जाणार असल्याचेही आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी अब्दुल मोईद, संचालक, ईआरटीएल (पश्चिम), एस. के. गुप्ता, संचालक (प्रकल्प), ए. ए. भट्ट, संचालक (प्रणाली), आर. रमणा, कार्यकारी संचालक (नियोजन), राजीव, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक), राजीव कुमार, कार्यकारी संचालक (सिग्नल आणि दूरसंचार), सी. एम. जाधव, कार्यकारी संचालक (स्थापत्य) यांसह मुं.मे.रे.कॉ.चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community