मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील अनेक वॉर्ड बॉय आणि आयाबाईंच्या रिक्तपदांमुळे रुग्णालयीन सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता या रिक्तपदी नव्याने भरती न करता खासगी संस्थांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाणार आहे. यासाठी महापालिकेने खासगी संस्थेची नेमणूक केली असून पुढील तीन वर्षांकरता कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे.
कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय
महापालिकेच्या शीव रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्या कारणाने रुग्णालयावर कामाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे यासाठी लागणारे मनुष्यबळ सेवा खासगी संस्थेद्वारे पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात २७६ कक्ष परिचर तसेच १३५ आयाबाई अशाप्रकारे एकूण ४११ मनुष्यबळाच्या पुरवठ्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एन.के. कार्पोरेशन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षे वॉर्ड बॉय व आयाबाईंचे सेवा पुरवठा करण्यासाठी नियुक्ती करण्यात येत असून यासाठी ४३ कोटी ७२ लाख १९ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या बालेकिल्लात आव्हानाची भाषा; म्हणाले….)
महापालिकेने मागवलेल्या निविदेत अटी
या संस्थेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या वॉर्ड बॉय तसेच आयाबाई यांना भविष्यात महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणत्याही प्रकारचे फायदे मिळणार नाही, तसेच याबाबत कोणतीही जबाबदारी महापालिकेवर राहणार नाही. याशिवाय महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत सामावून घेतले जाणार नाही किंवा भविष्यात महापालिकेत नोकरीची हमी दिली जाणार नाही अशाप्रकारची अटच महापालिकेने मागवलेल्या निविदा अटी तसेच करारामध्ये नमुद केली आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कंत्राटी पध्दतीवरच असतील असे महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community