राणीबागे जवळील भूखंडाचे श्रीखंड; उद्यान, प्राणी संग्रहालयाचे आरक्षण रद्द करून रहिवाशी वापराचे आरक्षण

154

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या (राणीबाग) जवळील उद्यान तथा बगीचा तसेच प्राणी संग्रहालयाकरता आरक्षित असलेल्या एका भूखंडाचे आरक्षणच बदलण्याचा घाट घालण्यात आला असून हे आरक्षण आता रहिवाशी वापरामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे आहे. प्राणी संग्रहालयाचे आरक्षण रद्द करून त्या भूखंडावर  निवासी वापराच्या आरक्षणाच्या फेरबदलाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्राणी संग्रहालयाशेजारी असलेल्या या आरक्षित भूखंडाची जागा महापालिका हस्तांतरीत करणार होती, परंतु आजवर यासाठी कोणताही प्रयत्न न केल्याने अर्जदाराने केलेल्या मागणीनुसार आरक्षणात फेरबदल करत खासगी जमीन मालकास लाभ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

विस्तारीत प्राणी संग्रहालयाच्या बांधकामाचा बृहत आराखडा तयार

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाकरता यापूर्वीच बाजुच्या मफतलाल यांच्या ताब्यातील आरक्षित भूखंड महापालिकेने ताब्यात घेत त्यावर विस्तारीत प्राणी संग्रहालयाच्या बांधकामाचा बृहत आराखडा तयार केला आहे. हा बृहत आराखडा तयार करताना आसपासच्या भूखंडाचा विचार केला  नसला तरी राणीबागेला जोडून असलेल्या नगर भू क्रमांक ५९० या १३७३.७५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उद्यान, बगीचा तसेच प्राणी संग्रहालय अशा प्रकारचे आरक्षण होते.

(हेही वाचा महापालिका शीव रुग्णालयांमध्ये वॉर्ड बॉय, आयाबाईंची पदे रिक्त; खासगी संस्थेमार्फत घेतली जाते सेवा)

नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार केला जाणार

या भूखंडावर  तळ अधिक एक मजल्याची इमारत असून १९९१च्या विकास आराखड्यात राणीबागेचा विस्तार करण्यासाठी हा भूखंड आरक्षित करण्यात आला होता. मात्र, नवीन २०३४च्या विकास आराखड्यानुसार हा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न व्हायला हवा होता, परंतु या भूखंडावरील आरक्षणानुसार भूसंपादनाची कार्यवाही न झाल्याने या भूखंडावरील ईपी रद्द करताना जागेवरील वस्तूस्थिती, भूखंडांचे अत्यल्प क्षेत्रफळ व भूखंडावरील अस्तित्वातील इमारती या बाबी विचारात घेऊन भूखंडाचे प्रस्तावित फेरबदल रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या भूखंडावरील उद्यान तथा बगीचा तसेच प्राणी संग्रहालयाचे आरक्षण रद्द करून हा भूखंड निवासी पट्ट्यांमध्ये अंतर्भूत करण्याची अधिसूचना शासनाच्यावतीने जारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीकोनातून आरक्षण फेरबदल करत विस्तारीत राणीबागेची जागा कमी करून खासगी जमीन मालकाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यामातून केला जात असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणाच्या फेरबदलाला अंतिम मंजुरी प्राप्त करण्यासाठी आता महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या माध्यमातून नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.