वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी केलेल्या शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत या विधानावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिवसेनेचं घर उद्ध्वस्त केलं. सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती न घर का न घाट का अशी झाली आहे, असं संजय शिरसाट प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
संजय शिरसाट म्हणाले की, ‘ज्या दिवशी वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाली होती, त्यादिवशी मी ही आघाडी जास्त काळ चालणार नाही सांगितलं होत. या दोन दिवसांमधील चित्र पाहिलं तर यांच्यामध्ये इतक्या लाथाड्या झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंची तर अवस्था न घर का न घाट का. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे का? तर नाही. काँग्रेस त्यांच्यासोबत आहे का? तर नाही. मग हे नेमके कोणासोबत आहेत? एक मात्र निश्चित आहे, शरद पवारांसोबत संजय राऊत आहेत. एवढाच काहीतरी या आघाडीतला दुवा राहिला आहे. आज जे घटतंय ही भविष्याची नांदी आहे.’
पुढे शिरसाट म्हणाले की, ‘मला याचं गोष्टीचं वाईट वाटतंय, जे आम्ही सांगतोय ते कधी त्यांनी ऐकलं नाही. परंतु इतरांची साथ घेणं त्यांना योग्य वाटलं. इतरांबरोबर जाणं योग्य वाटलं. त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. आज उद्धव ठाकरेंना विचारलं की, नेमकं तुमच्यासोबत कोण आहे. तर ते म्हणतील, मी एकटाच आहे. अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. शिवसेना संपवायला संजय राऊत जबाबदार आहेत. शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिवसेनेचं घर संपवलं आहे. आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.’
(हेही वाचा – अखेर भाजपचं आंदोलन यशस्वी ठरलं; मालाडमधील उद्यानाला दिलेलं टिपू सुलतान नाव बदललं)
Join Our WhatsApp Community