गोवरचे ७२ टक्के मृत्यू नऊ महिन्यांच्या आतील बाळांचे; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

174

गेल्या वर्षापासून राज्यात गोवरचा उद्रेक होत बालकांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. गोवर नियंत्रणात राज्य आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरल्याचा निर्वाळा राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. आता याबाबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी पुण्यात तातडीने बैठक बोलावली आहे. गोवरमुळे राज्यात ७२ टक्के मृत्यू नऊ महिन्यांखालील नवजात बालकांचे झाल्याने, गोवरचे रुग्ण हाताळताना बालकांच्या मातांबाबतही माहिती घेतली जावी, असा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. लहान वयातील गर्भारपण, अनेमियाग्रस्त गर्भवती महिला या मुद्द्यांवरही शुक्रवारच्या बैठकीत चर्चा केली जाईल.

गोवरचा उद्रेक होताच राज्यात स्वतंत्र गोवर तपासणी प्रयोगशाळांची निर्मिती करणे, गोवर हा गंभीर आजार असल्याचे घोषित करणे याबाबत गेल्या तीन महिन्यांत आरोग्य विभागाने कोणत्याही सकारात्मक हालचाली केलेल्या नाहीत. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या आदेशाकडे कानाडोळा करत गोवरच्या केसेस हाताळल्या जात असताना नवीन वर्षांत मुंबईत पुन्हा गोवरमुळे लहान बालकांचे मृत्यू होऊ लागले. नऊ महिन्यांहून कमी वयोमान असलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ होणा-या मृत्यूनंतर नवजात बालकांच्या आरोग्यासह मातांच्या प्रसूतीच्या काळातील वय, वजन या घटकांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत गोवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले. नऊ महिन्यांहून कमी वयाच्या बालकांना नियमित गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध नसल्याने याप्रकरणी केंद्राचाही सल्ला घेतला जावा, हा मुद्दा शुक्रवारच्या बैठकीत मांडला जाईल. देशात ६० ते ६५ टक्के महिलांना अनेमियाचा आजार आहे. या आजारात गर्भारपण राहिल्यास माता तसेच बाळालाही धोका असतो. कित्येकदा बाळ जन्मल्यानंतरही विविध आजारांमुळे दगावते. वाढत्या गोवर मृत्यू मागे नऊ महिन्यांखालील नवजात बालकांचा समावेश जास्त असल्याने यावर केंद्राकडून लसीकरणाशी संबंधित ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, अशी शिफारसही बैठकीत केली जाईल.

मार्चपर्यंत गोवरचा कहर

राज्यात साधारणतः जानेवारी महिन्यापासून गोवरचे रुग्ण दिसून येत आहेत. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोवरचे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या अखेरिस राज्यात गोवरचा उद्रेक दिसून आला. आता गोवरसाठी पोषक हवामान असल्याने गोवरच्या केसेसकडे कानाडोळा करू नका, असा सल्लाही राज्य गोवर टास्क फोर्सने आरोग्य विभागाला दिला आहे. (हेही वाचा – ‘हर घर जल मोहीम’: भारतातील 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना आता नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.