विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबला; ३० जानेवारीला मतदान

142

राज्यात बहुचर्चित असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील ५ जागांवरील निवडणुकांसाठीचा प्रचार शनिवार, २८ जानेवारी रोजी संपला. आता ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी सगळ्याच पक्षांनी जोर लावला आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मविआकडून अजित पवार या दोघांनीही जोरदार प्रचार केला. निवडणुकीदरम्यान दारूविक्रीवर घातलेली बंदी केवळ निवडणुकीच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीलाच असणार आहे. तर मतमोजणीच्या दिवशीही दारुविक्री सुरु राहणार आहे.

कोणत्या मतदारसंघात कोणाची लढत?

कोकण शिक्षक मतदार संघ

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात आहे. पण मुख्य लढत महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात आहे.

(हेही वाचा मिराज, सुखोई लढाऊ विमाने एकमेकांना धडकली; अपघात होण्यामागे काय आहेत कारणे?)

मराठवाडा शिक्षक मतदार संघ

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन बंडखोर असल्याने याचा फटका महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंना बसण्याची शक्यता आहे

नागपूर शिक्षक मतदार संघ

नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने समर्थन दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे उमेदवार नागो गाणार, महाविकास आघाडीने पाठींबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत होतेय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सतीश इटकेलवारही रिंगणात आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघ

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मविआकडून धीरज लिंगाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी तिसऱ्यांदा पदवीधरांचे नेतृत्व करण्यासाठी कंबर कसली आहे. अमरावती विभागात दुहेरी लढत असली तरी बंडखोर मात्र डोकेदुखी वाढवणार असल्याचे दिसत आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघ

नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या 22 उमेदवार रिंगणामध्ये असले तरी अपक्ष सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात चुरस आहे.

(हेही वाचा तब्बल ५३ टक्के लोक म्हणतात, देशात ‘लव्ह जिहाद’ सुरु आहे!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.