पुण्यातील जुन्नर आणि नाशिक पाठोपाठ साताऱ्यातही बिबट्यांचा वावर आता वाढू लागला आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे आता मानवी वस्ती बिबट्यांना खुणावू लागली आहे. मध्य महाराष्ट्रात ऊसाच्या मळ्यात बिबट्यांचा नवा अधिवास तयार झाला आहे. परिणामी, उसाच्या शेतात माणसांवर बिबट्यांचे हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू होण्याच्या घटना होत आहेत. तसेच साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुक्यातील ऊसाच्या शेतात वर्षागणिक बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नर बिबट्यांवर शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी आता वन्यजीव अभ्यासकांच्या गटातून जोर धरु लागली आहे.
सातारा आणि कराड तालुक्यातील ४० गावांमध्ये आता बिबट्याचा वावर दिसून येत आहे. वीस वर्षांपूर्वी या गावाजवळ बिबट्यांचा वावरही नव्हता. आता रोज बिबट्या गावातील एका पाळीव प्राण्याला मारुन खात असल्याच्या घटना दिसून येतात. दरवर्षाला ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर बिबट्याचे हल्ले होऊ लागले आहेत. सातारा वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक यांनी साताऱ्यातील वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली. पूर्वी मादी बिबट्या दोन बछड्यांना जन्म द्यायची.आता एकाचवेळी मादी बिबट्या तीन ते चार बछड्यांना जन्म देत आहे. यापैकी पन्नास टक्के बछडे जगतात.
सातारा वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगलात राहणाऱ्या बिबट्यांनीही शिकारीसाठी मानवी वस्तीजवळ सहजतेने आढळणाऱ्या भक्ष्यांना पसंती दिली आहे. साताऱ्यात मानव-बिबट्या संघर्ष शिगेला पोहोचत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
साताऱ्यातील बिबट्याच्या अधिवासाची माहिती देणाऱ्या घटना
गेल्या महिन्याभरात ऊसाच्या शेतात आईपासून विलग झालेल्या बछड्यांना सलग सोळावेळा मिलन घडवून आणण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. बिबट्यामुळे साताऱ्यात दर दिवसाला पाळीव प्राण्याची शिकार केली जाते. तीन वर्षांत तीन मुलांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका मुलाचा बळी गेला.
Join Our WhatsApp Communityआपण आता बिबट्यासोबत राहायला शिकायला हवे. बिबट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. ऊस शेती हे बिबट्याला निवा-यासाठी पोषक बनली आहे. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलक्षेत्राबाहेर वाढलेला बिबट्याचा वावर खरोखरच चिंतेची बाब आहे. – रोहन भाटे, मानद -वन्यजीव रक्षक , सातारा, वनविभाग