ऑस्ट्रेलियातील काही खलिस्तानी समर्थकांनी हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअरमध्ये खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात पाच भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याचे ऑस्ट्रेलिया टुडेने ट्विट करत सांगितले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांचा निषेध केला.
दोषींवर कारवाई करावी
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांचा मी तीव्र निषेध करतो. देशाची शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
( हेही वाचा: पाकिस्तानला हाकला, आम्हाला वाचवा; POKतील नागरिकांची भारताकडे याचना )
खालिस्तानी कारवाया वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात खालिस्तानी कारवाया वाढल्या आहेत. अलीकडे खालिस्तान समर्थकांनी हिंदू मंदिरांवरही अनेकदा हल्ले केले आहेत. 17 जानेवारीला मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला होता. मंदिराच्या भिंतींवर खालिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या निवेदनात या हल्ल्यावर टीका करण्यासोबतच खालिस्तान समर्थकांच्या वाढत्या कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. भारतीय उच्चायुक्तालयानेही या घटनांचा तीव्र निषेध केला होता.