महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान! पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य?

186

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहभाग घेतला होता. दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचालनात महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रासह १७ राज्यांचे आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे १० असे एकूण २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सहभागी झाले होते.

याआधी २०१५ मध्ये वारी ते पंढरपूर या महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१८ मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा बहुमान मिळाला. २०२२ मध्ये लोकप्रिय श्रेणीमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाची विषय हा नारीशक्तीवर आधारीत साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती असा होता. या माध्यमातून राज्यातील मंदिर शैली, लोककला, नारीशक्तीचा अमूर्त वारसा प्रदर्शित करण्यात आला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तश्रृंगी अशा या साडेतीन शक्तिपीठांना स्त्री शक्तीचे स्त्रोत मानले जाते, चित्ररथाच्या माध्यमातून याचे दर्शन घडवण्यात आले.

चित्ररथाची संकल्पना

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले होते. तसेच संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले होते. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले होते. दरम्यान ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली होती. महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केला आहे.

पहिल्या ३ स्थानी कोणती राज्ये? 

चित्ररथामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याला तर उत्तराखंडचा चित्ररथाने पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळवला असून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.