मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आपली चिकित्साअंतर्गत चाचण्याची सुविधा पुरवण्यात आली असली तरी यासाठी नेमलेल्या संस्थांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने नव्याने संस्थांची निवड केली जात आहे. नव्याने नेमलेल्या संस्थेने यापूर्वी देण्यात येणाऱ्या मुलभूत चाचण्यांच्या २२३ रुपयांच्या तुलनेत ८६ रुपये आणि विशेष तथा प्रगत रक्त चाचण्यांच्या प्रति चाचणीकरता ८९२ रुपयांच्या तुलनेत ३४४ रुपये देऊ केला आहे. मात्र, नव्याने नेमण्यात आलेल्या संस्थेचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने आणि आधीच्या संस्थेचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेला जुन्या संस्थेकडूनच वाढीव दराने रक्त चाचण्यांकरता पैसे मोजावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयोगशाळांकडून अर्ज मागवले होते. महापालिकेच्या माध्यमातून आपली चिकित्सा अंतर्गत मुलभूत तसेच विशेष तथा प्रगत रक्त चाचण्यांकरता नेमण्यात आलेल्या संस्थांचा कालावधी ३१ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेने निविदा मागवली होती. त्यामुळे ही योजना महापालिकेने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साच्या नावाने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये मागवलेल्या या निविदेमध्ये क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये आणि विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित मानला जात आहे.
(हेही वाचा – मुंबई आणि पुणे विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळणार; राज्यपालांकडून निवड समित्या जाहीर)
हा प्रस्ताव १२ जानेवारी २०२३ रोजी प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता, परंतु आधीच्या संस्थेची मुदत संपुष्टात येत असतानाही जिथे एका दिवसांमध्ये प्रस्तावांना मंजुरी देणाऱ्या प्रशासकांना या रक्त चाचण्यांच्या चिकित्सेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी ३० जानेवारी २०२३ पर्यंतची वाट पहावी लागली. प्रशासकाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात विलंब झाल्याने आधीच्या संस्थेची मुदत ३१ जानेवारी रोजी संपुष्टात येत असल्याने एक तर नवीन संस्थेची अंमलबजावणी होईपर्यंत थांबावे लागेल किंवा या योजनेत खंड पडू नये म्हणून जुन्या संस्थेला मुदतवाढ द्यावी लागेल. तसे झाल्यास मुंबई महापालिकेला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते,असे बोलले जात आहे.
ठळक वैशिष्ट्ये
- मुलभूत रक्त चाचण्या ८९ आणि विशेष तथा प्रगत रक्त चाचण्या ४८
- मूलभूत रक्तचाचण्या वर्षाला ५ लाख
- विशेष व प्रगत रक्तचाचण्या वर्षाला ७५ हजार
- आपली चिकित्साअंतर्गत मुलभूत चाचण्यांपैकी एक वेळच्या रक्त चाचण्यांकरता २२३ रुपये देण्यात येत होते
- विशेष व प्रगत चाचण्यांकरता यापूर्वीच्या संस्थांना देण्यात येणारा प्रति रक्त नमुना दर ८९२ रुपये
- संपूर्ण मुंबईसाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड कंपनीची निवड
- ‘क्रस्ना’ ने मुलभूत चाचण्यांकरता देण्यात येणारा दर ८६ रुपये
- ‘क्रस्ना’ने विशेष तथा प्रगत चाचणीपैंकी प्रति रक्त नमुना दर ३४४ रुपये
- मागील संस्थांना देण्यात येणाऱ्या शुल्काच्या तुलनेत सुमारे ७० टक्के दर कमी