दादर येथील कीर्ती कॉलेज या ठिकाणी ७० वर्षीय वृद्धेच्या घरात घुसलेल्या शस्त्रधारी इसमाने वृद्धेला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १२ लाख रुपयांच्या ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दादर परिसरात भरदिवसा घडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दादर पोलिसांनी याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, दरोडेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
दादर येथील काशीनाथ धुरू मार्ग, कीर्ती कॉलेज परिसरात एका रहिवासी इमारतीच्या ८ व्या मजल्यावर एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरी सोमवारी सायंकाळी चाळीशीतील एक अनोळखी इसम रायकर याने मिठाई पाठवली असल्याचे सांगून एकट्या राहणाऱ्या वृद्धेच्या घरात बळजबरीने प्रवेश मिळवला. त्यानंतर त्याने स्वतःजवळील रिव्हॉल्वर काढून वृद्ध महिलेच्या गळ्यावर रोखले आणि जीवे मारण्याची धमकी देत बेडरूममध्ये आणले व बेडरूममधील कपाट बळजबरीने खोलण्यास सांगून कपाटातील सोनेनाणे व पैसे असा एकूण १२ लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.
या दरोड्याच्या घटनेने घाबरलेल्या वृद्धेने शेजारच्या लोकांना जागे करून घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दादर पोलिसांना दिली.
( हेही वाचा: ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील कार्यालय तोडले )
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध दरोडा, शस्त्रबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृद्धेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर निळ्या रंगाची टोपी, निळ्या रंगाचा शर्ट आणि निळी पॅन्ट असा पेहराव घालून आला होता. दादर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोराच्या शोधासाठी विशेष पथक तयार करून त्याच्या मागावर पाठवले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, एकट्या दुकट्या राहणाऱ्या वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp Community