गर्भारपणात आणि कोरोना संसर्गामुळे मुंबईतील वाढत्या मातामृत्यूची संख्या रोखण्यात वैद्यकीय क्षेत्राला यश आले आहे. गर्भारपण काळातील संसर्ग (सेप्सिस), रक्तस्त्राव, क्षयरोग या कारणांमुळे मुंबईत गेल्या काही वर्षांत मातामृत्यूमध्ये वाढ झाली होती. पाच वर्षांपूर्वी मुंबईत दरवर्षाला २१८ मातामृत्यू होत असल्याची नोंद झाली होती. मात्र गेल्यावर्षी हे प्रमाण केवळ १९३ पर्यंत खाली घसरले. सद्यस्थितीत दर दोनदिवसांनी एक मातामृत्यूची नोंद होत आहे. हा आकडा पाच वर्षांपूर्वी फारच जास्त होता. त्यातुलनेत आता जागरुकतेने मातामृत्यूची संख्या कमी होण्यात यश येत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
२०१८ साली मुंबईत २१८ मातामृत्यूच्या नोंदी झाल्या होत्या. ही संख्या कमी होत २०२२ साली केवळ १९३ मातामृत्यूची नोंद झाली. दोन वर्षांच्या कोरोनाकाळातही कोरोनाच्या संसर्गामुळे मातामृत्यूची संख्या वाढली होती. परंतु लसीकरण तसेच आरोग्यविषयीच्या वाढत्या जागरुकतेमुळे गेल्या पाच वर्षांत मातामृत्यूचे प्रमाण मुंबईत फारच कमी नोंदवले जात असल्याने द फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रीक एण्ड गायनोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) या प्रसूतीरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संस्थेनेही समाधान व्यक्त केले.
मुंबईत मातामृत्यूध्ये २६ ते ३५ वयोगटातील मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटात गर्भधारणेला महिला जास्त पसंती देतात. त्याखालोखाल १९ ते २५ वयोगटातील महिला गर्भारपणाला प्राधान्य देत आहे. २६ ते ३५ आणि १९ ते २५ या दोन्ही वयोगटातील मातामृत्यूचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे.
(हेही वाचा – गोवरच्या केसेस शोधण्यात दिरंगाई नको! टास्क फोर्सचे आवाहन)
दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे गर्भवती महिलांचा मृत्यू होत होता. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ एकवर आले आहे. लसीकरणामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढल्याने तसेच महिलांनी गर्भारपणात सकस आहारावर भर दिल्याने आता मातामृत्यूवर मात करण्यात यश येत असल्याची माहिती फॉग्सी या संस्थेच्या समन्वयक तसेच महाराष्ट्र शाखेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव डॉ कोमल चव्हाण देतात.
गेल्या पाच वर्षांतील मातामृत्यूची आकडेवारी
वर्ष मातामृत्यूची संख्या
२०१८ २१८
२०१९ २५७
२०२० १९७
२०२१ १९०
२०२२ १९३
मातामृत्यूची कारणे आणि वर्ष
आजार २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२
सेप्सिस (संसर्ग) २८ २८ २२ २२ २१
रक्तस्त्राव २० ३२ १८ २१ २२
क्षयरोग २४ १७ १३ १८ १३
उच्चरक्तदाब ७ १६ ६ ३ २
हृदयविकार २० ९ ८ ९ ९
कोरोना ० ० २९ ४३ १
इतर कारणे १०७ १२८ ९८ ७४ १२२
एकूण २१८ २५७ १९७ १९० १९३
वयोगटानुसार मृत्यू
वर्ष एकूण मृत्यू वयोगट
१८ १९-२५ २६-३५ ३५पेक्षा जास्त
२०१८ २१८ ० १०६ ९२ २०
२०१९ २५७ २ १०३ १३१ २१
२०२० १९७ ० ७२ १०९ १६
२०२१ १९० ० ६९ १०७ १४
२०२२ १९३ २ ७६ ८६ २९