महाराष्ट्रातल्या विविध भागात अनेक कलाकार आपली कला वेगवेगळया स्वरुपात प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. या सर्व कलाकारांना आपली कला दाखविण्यासाठी, सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
( हेही वाचा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर)
चित्रकार मिलिंद लिंबेकर यांचे “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजन करण्यात आले आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार मिलिंद लिंबेकर यांच्यासह आशा महाकाले, हेश सरमळकर, चित्रकार विजय बोधनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी कलाकरांना हक्काचे डिजिटल व्यासपीठ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुनगंटीवार म्हणाले की, मिलिंद लिंबेकर नागपूरचे असून नागपूर येथील एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली असता त्यांनी मला जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांच्या चित्रप्रदर्शनाबाबत सांगितले. आतापर्यंत अनेकदा जहांगीर आर्ट गॅलरी येथे येण्याचा योग आला असला तरी येथे येऊन विदर्भातल्या चित्रकाराच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. मला विश्वास वाटतो की, येणाऱ्या काळात मिलिंद आपली कला फक्त विदर्भात, मुंबईत न पोहोचवता भारतभर पोहोचवेल अशी खात्री आहे.
भारतामध्ये कला, संस्कृती यांची विविधता आहे. तर महारराष्ट्रात तर कला, साहित्य, संस्कृती यामध्ये विविधता आहेच.आज महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे, आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. या डिजिटल व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराला आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
मिलिंद यांची आतापर्यंत पाच एकल चित्र प्रदर्शनी झाली आहेत. त्याचबरोबर देशभरातील अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनात त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या स्वरुपात मोठया खुबीने नाट्यमयता आणली आहे. या चित्रप्रदर्शनात बहुतांश चित्रे ही ऍक्रेलिक माध्यमातील आहेत.
Join Our WhatsApp Community