आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणांतून सांगत असतात. दादर रेल्वे स्थानकात नुकतीच त्याची प्रचिती आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या एका फोनमुळे ग्रामीण भागातून आलेल्या सहा तरुणींना रात्री सुरक्षित आसरा मिळाला. त्यामुळे या तरुणींच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यतत्परतेचे आभार मानले आहेत.
पोलीस भरतीसाठी नाशिकमधून या सहा तरुणी मुंबईत आल्या होत्या. नायगाव येथे पोलीस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी त्यांना राहण्याची जागा अचानक नाकारण्यात आली. त्यामुळे आता थांबायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. हॉटेलचा खर्च परवडणारा नव्हता. खिशात पैसेही नव्हते. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकातील फलाटावरच आसरा घेण्याचे त्यांनी ठरवले. फलाटावर एक बॅनर पांघरला आणि रात्र तेथेच काढण्याचे मनाशी निश्चित केले. पण, रात्रीच्या वेळी तेथे गर्दुल्ले, पाकीटमारांचा वावर असल्यामुळे आपण सुरक्षित राहू का, याची भीती त्यांच्या मनात होती. त्रस्त, चिंतीत व भयभीत अवस्थेत असलेल्या या मुलींना पाहून पत्रकार अस्मिता पुराणिक यांनी त्यांची विचारपूस केली.
संपूर्ण रात्र दादर स्थानकात काढणे या तरुणींच्या सुरक्षेच्यादृष्टीने फारच गंभीर असल्याने पुराणिक यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधला. परंतु, प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहात २ तासांच्या वर राहता येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे यांच्या कानावर घडला प्रकार घातला. त्यांनी लागलीच स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधत सहाही मुलींना रात्री सुखरूप राहण्यासाठी महिला वेटींग रुममध्ये व्यवस्था केली.
( हेही वाचा: लवकरच कोविड काळातील मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार उघड करणार; सोमय्यांचा इशारा )
पालक म्हणतात…
या मुलींना सकाळी पाच वाजता नायगाव येथील पोलीस ग्राऊंडवर पोहोचायचे होते. रात्री भरपेट जेवण आणि पुरेशी झोप मिळाल्यामुळे त्या निर्धास्तपणे शारिरीक कसरतीत सहभागी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या सुरक्षा कवचामुळेच रात्री अनोळख्या ठिकाणी आपल्या मुली सुरक्षित राहिल्या. त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत, अशी प्रतिक्रिया या तरुणींच्या पालकांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community