विमानतळाशेजारील रस्त्यांचे नशीब फळफळले, आता डांबरीकरण आणि वर्षभरात सिमेंटीकरण

202

जी २० या परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवणार असल्याने या परिषदेच्या १४ बैठका महाराष्ट्रात होणार असून जगभरातील विविध देशांमधून सुमारे २०० मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या परिषदेसाठी उपस्थित राहण्याकरता येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी मुंबईतील रस्ते तुळतुळीत राखण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ गेट क्रमांक ८ पासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत हंसभुग्रा मार्गासह इतर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जी २० परिषदेकरता या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सुमारे सव्वा आठ कोटी रुपये खर्च केले जात असले तरी पुढील वर्षांत या सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या परिसरारातील सर्व रस्त्यांचा एक ते दीड वर्षांत दोनदा विकास केला जाणार असल्याने महापालिकेच्या तिजोरीतून दोनदा कोट्यावधी रुपये खर्च होणार त्यामुळे कंत्राटदारांचेही नशीब फळफळले जाणार आहे.

( हेही वाचा : ‘तेजस’चे उतरले ‘तेज’; पैसे फुल, सुविधा गुल )

राज्याच्या मुख्य सचिवांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पूर्व तयारीच्या बैठकीत सर्व संबंधित शहरातील रस्त्यांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. त्याअंतर्गत पश्चिम उपनगरातील एच पूर्व विभागातील व्हीव्हीआयपी मार्गाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ गेट क्रमांक ८ पासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत हंसभुग्रा मार्गासह आणि इतर डांबरी रस्त्यांचे तातडीने पुनपृष्ठीकरण अर्थात सरफेसिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने यासाठी निविदा मागवली. यामध्ये मागवलेल्या निविदेमध्ये रणुजा देव कॉर्पोरेशन ही कंपनी पात्र ठरली असून या सर्व रस्त्यांवर ८ कोटी २५ लाख रुपये खर्च केला जात आहे.

महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यांच्या कामांमध्ये एअरपोर्ट अॅथॉरिटी रस्त्यांच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेताना, या रस्त्यांवर होणारा एकूण प्रकल्प खर्च वसूल करण्यात येईल. या रस्त्यांचे काम नोव्हेंबरला हाती घेऊन त्याचा विकास करण्यात आला आहे. हे काम एक महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले असून याचा दोष दायित्व कालावधी हा दोन वर्षांचा आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात खड्डा पडल्यास किंवा खराब झाल्यास त्याची डागडुजी करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असेल.

विशेष म्हणजे आगामी काळात मुंबई शहरातील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून ज्या पाच रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे, त्यातील एक खासगी रस्ता आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाकरता दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२३ मध्ये निविदा मागवण्यात येणार आहे. त्यामुळे यारस्त्यांची कामे ऑक्टोबर २०२३ सुरु होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

या रस्त्यांचे झाले डांबरीकरण, पुढील वर्षांत होणार सिमेंटीकरण

  • छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट गेट क्रमांक ०८ ते मिलिटरी कॅम्प जंक्शन सांताक्रुझ पूर्व
  • मिलिटरी कॅम्प मार्ग, सांताक्रुझ पूर्व
  • सीएसटी मार्ग, सांताक्रुझ पूर्व
  • हंसभुर्गा सांताक्रुझ पूर्व
  • व्हीव्ही आयपी मार्ग लगत असणारे इतर मार्ग सांताक्रुझ पूर्व
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.