आरेत छोटा कश्मीर परिसराजवळ गुरुवारी सकाळी बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह सापडला. घटनेबाबत माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वनाधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, प्रथमदर्शनी अहवालात बिबट्याच्या मानेवर चावल्याच्या खुणा आहेत. कुत्र्यांनी किंवा बिबट्यानेच त्याच्या मानेला चावल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षांत दिवाळीच्या पहिल्या दिवशी आरेत युनिट क्रमांक १७ येथे दीड वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ३२ वर्षीय महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता. अखेरीस वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला जेरबंद केले. या घटनांनंतर गुरुवारी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत स्थानिकांना सकाळी दिसून आला. अंदाजे सात महिन्यांचा नर बछडा जखमी अवस्थेत स्थानिकांना पाहायला मिळाला. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. शवविच्छेदनासाठी बिबट्याच्या बछड्याला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. प्रथमदर्शनी बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत दिसून आला आहे. वनविभागाच्या नोंदीत आरेत सध्या ९ ते १० बिबट्यांचा वावर आहे.
(हेही वाचा – वसई महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात: चालकाचा जागीचा मृत्यू)
Join Our WhatsApp Community