एनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती १८ लाखांवरुन थेट एक कोटींवर; राज्य शासनाचा निर्णय

127
महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी यावर्षीपासून १८.२५ लाख रुपये रक्कमेत वाढ करुन थेट एक कोटी रुपये एवढ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) छात्रांसाठी ही बाब मनोबल वाढवणारी ठरेल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) गुणवंत छात्रांचा उत्साह वाढवण्यासाठी सन १९९२ पासून राज्यात मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी १८.२५ लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली होती. या रकमेच्या व्याजातून पात्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील छात्रांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र, या अत्यंत तोकड्या रकमेच्या व्याजातून प्रति छात्राला प्रति वर्षी २ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते होती. यामधून छात्रांना आर्थिक खर्च भागविण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत होती.
त्यामुळे विद्यमान शिष्यवृत्ती निधीची रक्कम १ कोटी रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक यांनी केली होती. वाढीव निधीसाठी क्रीडा मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी कॅडेट्स सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांसाठीच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या निधीत एक कोटी रुपयांपर्यंत वाढीची घोषणा केली असल्याचे क्रीडा मंत्री महाजन यांनी सांगितले.

राज्य एनसीसीचा विक्रम

महाराष्ट्रातील राष्ट्रीय छात्र सेनेने स्थापनेपासून राज्याचे नाव उज्ज्वल केले असून आतापर्यंत महाराष्ट्रासाठी ३३ पैकी १८ वेळेस प्रतिष्ठित असा प्रधानमंत्री बॅनर जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे. तसेच ८ वेळेस उपविजेता ठरले आहेत. ही कामगिरी महाराष्ट्रासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या निधीत वाढ केल्यामुळे छात्र सैनिकांचे मनोबल वाढवणारी तसेच त्यांना राष्ट्राच्या उदात्त हेतूसाठी अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करेल, असे यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.