बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या कोविड काळातील थकित मानधनाबाबत चौकशीचे निर्देश

230

कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

( हेही वाचा : पुढील आठ दिवसांत या माध्यमातून स्वीकारणार नाही मालमत्ता कराची रक्कम)

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) अंतर्गत कंत्राटी बस चालकांच्या आणि कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच मे. हिंदुस्थान कोको कोला कंपनीतील कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक यांचे सल्लागार प्रकाश खवरे तसेच संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कामगारांचे हीत जोपासले जाईल

मंत्री डॉ. खाडे म्हणाले की, कामगारांना नियमित आणि वेळेत वेतन देणे, हे प्रत्येक आस्थापनेचे कर्तव्य आहे. कामगारांच्या वेतनातील भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विम्याचे हप्ते कपातीमध्ये नियमितता ठेवून आस्थापनांनी त्यांचा हिस्सा विनाविलंब द्यावा. कामगारांना सक्तीची स्वेच्छानिवृत्ती देऊ नये. मर्जीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना नियमानुसार निवृत्ती वेतनाचे लाभ द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

कंपनीने कामगारांना दिलेल्या स्वेच्छानिवृत्ती विषयक सूचना, पूर्वकल्पना, स्वेच्छानिवृत्तीचे भरून घेतलेले अर्ज, दिलेली रक्कम आदींची माहिती तात्काळ विभागाला सादर करावी. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी करून स्वेच्छानिवृत्तीची रक्कम नियमानुसार दिलेली नसल्यास ती कामगारांना तातडीने अदा करावी. कामगारांचे हीत जोपासले जाईल, असे निर्णय घेण्याच्या सूचना मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.