हाताच्या प्रत्यारोपणाचा खर्च गेला आवाक्याबाहेर

227

परळ येथील ग्लोबल रुग्णालयात जन्मतःच उजव्या हाताला व्यंग असलेल्या १८ वर्षांच्या सामिया मन्सुरी या मुलीवर यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी कुटुंबाला अंदाजे ३० लाखांहून अधिक खर्च येण्याची शक्यता आहे. मुंबईत केवळ ग्लोबल या खासगी आणि केईएम या पालिकेच्या रुग्णालयात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. केईएम रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणासाठी केवळ ९ लाख ४४ हजारांचा खर्च येत असताना खासगी रुग्णालयांत हाताच्या प्रत्यारोपणासाठी नाव नोंदवणा-या रुग्णांच्या कुटुंबीयांना अंदाजे ३० लाख रुपये खिशातून मोजावे लागत आहे. या महागड्या शस्त्रक्रियांसाठी क्राउड फण्डिंगच्या माध्यमातून पैसा गोळा करुन सानियाचे कुटुंबीय आता डिस्चार्जच्या तयारीला लागले आहे. डिस्चार्जपर्यंत कितपत लाखांचे बिल होईल, याची अंदाजात्मक कल्पना केवळ ३० लाखांची असल्याचे सामियाचे वडिल असिफ मन्सुरी सांगतात.

१८ वर्ष पूर्ण होताच शस्त्रक्रिया

सामिया ही गुजरात येथील भरुच येथील रहिवासी असलेल्या असिफ मन्सुरी यांची दुसरी मुलगी. पत्नीच्या गर्भारपणाच्या काळात सहाव्या महिन्यात डॉक्टरांनी असिफ यांना पत्नीच्या पोटातील बाळाला एक हात विकसित झाला नसल्याची कल्पना दिली. असिफ यांनी व्यंगासह मुलीला जन्म देण्याचे ठरवले. सामिया तिच्या दैनंदिन जीवनात सानियाची आई मदत करत असे. व्यवसायाने कॅमिकल अभियांत्रिकी असलेल्या असिफ मन्सुरी यांनी कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी दक्षिण अरब प्रांतात चौदा वर्षांपूर्वी नोकरी मिळवली. सामिया वडिलांप्रमाणेच लिखाणाचे काम डाव्या हाताने करु लागली. सात वर्षांपूर्वी सामिया ब-यापैकी स्वतःचे दैनंदिन काम आता डाव्या हाताने करु लागली होती. दक्षिण अरब देशांत असताना मन्सुरी यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली. ग्लोबल रुग्णालयाच्या प्लास्टीक, हात पुनप्रक्रिया मायक्रोसर्जन यांच्या टीमशी मन्सुरी यांनी संपर्क केला. त्यावेळी सानिया १६ वर्षांची होती. यंदा १० जानेवारीला सामिया वयाची १८ वर्ष पूर्ण करताच हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वैज्ञानिकदृष्ट्या पात्र झाली. प्रत्यारोपणासाठी दात्याचा शोध सुरु असतानाच इंदौर येथील ५४ वर्षीय महिलेने मृत्यूपश्चात सानियासाठी तिचे हात दान केले.

(हेही वाचा साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा )

खर्चाचा तपशील 

इंदौरहून हॅलिकॅप्टरने हात मुंबईत आणताच डॉक्टरांनी १४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सामियाच्या उजव्या हातावर नव्या हाताचे प्रत्यारोपण केले. हवाईमार्गाेने हात मुंबईत आणण्यासाठी कुटुंबीयाला ७ लाखांचा खर्च आला आहे. तर शस्त्रक्रियेसाठी २३ लाखांचा खर्च रुग्णालयाने आकारला आहे. रुग्णालयातील इतर खर्चांबाबत अद्यापही कुटुंबीयाला नेमकी कल्पना नाही. इम्पॅक्ट गुरु या ऑनलाईन क्राउड फण्डिंगच्या माध्यमातून मन्सुरी कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळणार आहे. हाताच्या प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयात अजूनही फारशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयातूनही रुग्णांच्या हितावह रास्त किंमत ठेवली जावी, अशी मागणी वैद्यकीय सामाजिक संघटनांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.