तृतीयपंथांच्या उपचारांचा प्रश्न आता मिटला; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

124

तृतीयपंथी हा देखील समाजाचा घटक आहे. सर्वांसोबत विकास होण्यासाठी या वर्गातील लोकांच्याही समस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे. या तृतीयपंथी उपचार विभागाच्या माध्यमातून या लोकांच्या समस्या सोडवण्यात भर देण्यात येईल, असे आश्वासन शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी फोर्ट येथील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दिले. शुक्रवारी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात तृतीयपंथांसाठी देशातील पहिले विशेष कक्ष उभारले गेले. या विभागाच्या उद्घाटनप्रसंगी महाजन बोलत होते. येत्या काही दिवसांत जेजे रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालयातही तृतीयपंथांसाठी विशेष उपचार कक्ष सुरु केला जाणार आहे.

गोकुळदास रुग्णालयात तृतीयपंथांसाठी विशेष उपचार कक्ष तसेच व्यसनोपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जेजे रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत तसेच सलमा खान या उपस्थित होत्या. तृतीयपंथांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी ३० खाटांचा कक्ष आजपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत तृतीयपंथांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा महाजन यांनी व्यक्त केली. या कक्षात तृतीयपंथांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे. जेजे रुग्णालयात शुक्रवारपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळण्यासाठी उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसन या टप्प्यांतून उपचारांची सेवा दिली जाईल, असेही महाजन म्हणाले.

(हेही वाचा कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी भाजपाची नावे निश्चित; कुणाला मिळणार संधी?)

आतापर्यंत सरकारी रुग्णालयात भरती होताना रुग्णांच्या केस पेपरवर महिला व पुरुष असे दोन लिंगनिहाय रकाणे उपलब्ध असायचे. यात बदल केला असल्याचे जेजे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या. आता तृतीयपंथी असाही नवा रकाना रुग्णांच्या केस पेपरवर उपलब्ध होत असल्याची घोषणा त्यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.