भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी भारतीय सैन्यदलाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार, सैन्यात भरतीसाठीचे तीन टप्पे असतील. अनुक्रमे काॅमन एंट्रन्स टेस्ट, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि मेडिकल टेस्ट अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होईल.
यापूर्वी जी भरती प्रक्रिया होती त्यानुसार सर्वात आधी उमेदवारांची फिजिकल फिटनेस टेस्ट होत होती. त्यानंतर त्यांची मेडिकल म्हणजेच वैद्यकीय चाचणी केली जायची. नंतर शेवटच्या टप्प्यांत उमेदवारांना सीईई म्हणजेच काॅमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच लेखी परीक्षा द्यावी लागत होती. आता भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नव्या बदलांनुसार सर्वात आधी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर फिटनेस टेस्ट होईल. या दोन चाचण्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल.
( हेही वाचा: भाजपकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाला संधी नाही; चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी )
का बदलली भरती प्रक्रिया?
भारतीय सैन्यातील अधिका-यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, भरतीसाठी येणा-या हजारो उमेदवारांसाठी लागणारा मोठा प्रशासकीय खर्च आणि लाॅजिस्टिक व्यवस्थापनाचा विचार करता भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
आधीच्या प्रक्रियेनुसार, मोठ्या संख्येने येणा-या उमेदवारांचे स्क्रीनिंग केले जात होते. यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत होता. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बळ तैनात केले जात होते. आता नवीन भरती प्रक्रियेमुळे प्रशासकीय आणि लाॅजिस्टिक भार कमी होईल.
Join Our WhatsApp Community