मुंबईत प्रत्येक ४ पैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब (HT) आणि प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीला मधुमेह (DM) असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ३० वर्षांवरील रक्तदाबासंबंधी तपासणी आता घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या वर्षात ही तपासणी पूर्ण केली जाईल आणि आठवड्यातील एक दिवस अर्थात बुधवारचा दिवस यासाठी राखून ठेवला जाणार आहे. महानगरपालिकेने अलिकडेच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप्स सर्वेक्षणानुसार मुंबईतील ३४% लोकांमध्ये उच्च रक्तदाब तर १८% लोकांमध्ये मधुमेह आढळून आला आहे. सध्या एकूण लोकसंख्येपैकी ३० वर्षांवरील व्यक्तींची संख्या ४७ टक्के अर्थात ६६ लाख एवढी आहे. यासाठी मुंबईकरांसाठी ‘आरोग्यम कुटुंब’ ही संकल्पना राबवली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२३- २४चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. यामध्ये आरोग्य विभागासाठी १ हजार ६८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना केवळ अकाली मृत्यूचाच धोका नसतो, तर त्यांच्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पक्षाघात, मूत्रपिंडाचे डोळ्यांच्या समस्यांसारखी गुंतागुंत उद्भवू शकते. त्यामुळे जीव रक्षणासाठी उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य रोगाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी “आरोग्यम् कुटुंबम्” हा सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रम नियोजित केला असल्याची घोषणा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवर पूर्व तपासणी करणे, जागरुकता वाढवणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पध्दतींच्या धोरणांचा अवलंब करणे, रुग्ण केंद्रीत दक्षता आणि देखरेख प्रणाली इ. योजनांचा अवलंब करण्याचे प्रस्तावित आहे.
महानगरपालिकेने १६ रुग्णालयांमध्ये “उच्च रक्तदाब आणि मधुमेह विशेष तपासणी केंद्र” सुरु केली आहेत. त्याचा विस्तार सर्व रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य स्वयंसेविका तथा आशा सेविका, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील व्यक्तींची उच्च रक्तदाबासंबंधी तपासणी करतील.
उच्च रक्तदाबाच्या संभावित रुग्णांचा आरोग्य सेविका आणि आशा यांच्याद्वारे शोध घेऊन पुढील उपचारासाठी पाठपुरावा केला जाईल आणि सदर रुग्णाला जवळच्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना येथे पाठविण्यात येईल. उच्च रक्तदाबाच्या अंदाजित रुग्णसंख्येपैकी ५० टक्के रुग्णांना देखरेखीखाली आणणे आणि ५०टक्के एवढा पाठपुरावा व नियंत्रण दर गाठणे हे लक्ष्य आहे,असे त्यांनी सांगितले.
रुग्णांकडून औषधोपचार पूर्ण करुन घेण्यासाठी महानगरपालिकेने नवीन उपचार पध्दती तयार केली असून निश्चित औषध संयोजन खरेदी केले आहे. तसेच, रुग्ण स्मरण प्रणाली (पेशंट रिमांईंडर सिस्टीम) विकसित केली जाईल व वॉर्ड वॉर रुमद्वारे समुपदेशन आणि पाठपुरावा केला जाईल. आरोग्य सेविका आणि आशा यांच्या वापरासाठी उच्च रक्तदाब उपकरणे व संच (किट) देखील खरेदी केले आहेत.
प्रत्येक आरोग्य सुविधा स्तरावर मधुमेहाची तपासणी आणि उपचार तसेच आहार समुपदेशन सुविधेची खात्री देण्यात येईल. ज्यामुळे अनियंत्रित मधुमेहामुळे होणारे आजार जसे की त्वचेवर होणारे अल्सर), डोळयांच्या पडद्याचे आजार, मज्जातंतूचे आजार, मूत्रपिंडाचे प्रदीर्घ आजार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे धोके कमी होऊन मृत्यूदर कमी होईल.
( हेही वाचा: मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प: यंदाही १४ टक्क्यांनी वाढ )
शिव योग केंद्र मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर हृदयविकारांसारख्या जीवनशैली आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २४ प्रभागांमध्ये १३५ शिव योग केंद्रांची स्थापना केली आहे, ज्याद्वारे दररोज स ६,००० नागरिक प्रशिक्षित योग शिक्षकांकडून मोफत योग सत्राचा लाभ घेतात. यासाठी १५ इतकी तरतूद करण्यात आली आहे.
प्रसुतीगृह वर्ष २०२२ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने रावळपाडा, दहिसर पूर्व शिवाजीनगर, गोवंडी येथे दोन नवीन प्रसूतीगृहे सुरु केली आहेत.
सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर प्रसुती रुग्णालयात १२ खाटांचे ‘नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग’ बाहयस्त्रोताद्वारे सुरु करण्यात येणार आहे. मालवणी येथील ४९ खाटांच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रसुती रुग्णालयाच पुनर्विकास करण्यात येत आहे.
- दादर येथील जाखादेवी मंदिराशेजारी असलेल्या मोकळया जागेवर बहु-विशिष्ट रुग्णालयाच्या -इमारतीचे बांधकाम पूर्ण वेगाने सुरु आहे आणि हे बहु-विशिष्ट रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर चालविण्यात येणार आहे.
- ओशिवरा येथे १५२ खाटांच्या प्रसुती गृहाच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
- मोठया प्रमाणात आढळणारे कर्करोग आणि मानसिक आरोग्य तपासणीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.
- कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
- मुलुंड एम टी रुग्णालय ऑक्टोबर २३ पर्यंत बांधून पूर्ण होईल
- विक्रोळी पार्कसाईट येथील ३० खाटांचे रुग्णालय नोव्हेंबर २३ पर्यंत पूर्ण होईल
- वांद्रे भाभा विस्तारीत इमारतीचे काम मार्च २४ पर्यंत पूर्ण होईल
- गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालयाचे बांधकामासाठी एनओसीची प्रतीक्षा
- भांडुप आणि कांदिवली सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाला सुरुवात
- चांदिवली संघर्ष नगर येथील २५० खाटांच्या रुग्णालयाची लवकर निविदा
- वांद्रे भाभा, भगवती रुग्णालय, गोवंडी रुग्णालय राजावाडीच्या धर्तीवर रक्तघटक प्रयोगशाळा बनवण्यात येतील