मुंबईकरांना रस्त्यावर चालण्यास सुसज्ज आणि मोकळे पदपथ जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी पादचारी सुविधा देण्यात येणार असून पेडिस्ट्रीयन फर्स्ट या संकल्पनेनुसार ९ मीटरपेक्षा जास्त प्रत्येक रस्त्यांवर लोकांना चालता यावे याकरता पदपथ बनवल्या जातील, अशी घोषणा प्रशासकांनी केली.
मुंबई महापालिकेच्या सन २०२३-२४चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. यामध्ये रस्ते २८२५. ०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांचा विकास करताना यावर्षी मुंबई महानगरपालिका ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी पदपथ सुविधांचा नकाशा तयार करेल आणि जेथे पदपथ नसतील किंवा सुस्थितीत नसल्याचे आढळून येईल, तेथे चालण्यासाठी सुलभ आणि अशा पदपथ आंतरराष्ट्रीय स्तराच्या डिझाईन्ससह जलदगतीने नवीन सिमेंट कॉंक्रीट पदपथ बांधले जातील, असे प्रशासकांनी नमुद केले आहे. महानगरपालिका रस्ते खात्याने पदपथाची रचना करण्यासाठी शहरी रस्ते संकल्पचित्रकारांची यादी तयार केली आहे. एकदा हे पदपथ तयार झाले की मुंबईकरांना चालण्यासाठी सुखावह ठरतील, असा विश्वास प्रशासकांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत सुमारे ९९० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेले असून जानेवारी २०२२ मध्ये सुमारे २१० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. त्यामुळे सन २०२२-२३ मध्ये मागील वर्षांतील सुरु झालेली कामे व नव्याने दिलेले कार्यादेश अशाप्रकारे मिळून १६६ किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
( हेही वाचा: BMC Budget 2023-24:कचऱ्यापासून होणारे प्रदूषण रोखणार: मुंबई लावणार १ लाख झाडे )
गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे अनुक्रमे ७० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात आणि चौथ्या टप्प्यातील काम निविदा प्रक्रियेत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी येत्या वर्षात १०६० काटी रुपयांची तरतूद केली आहे. तर कोस्टल रोडचे काम ६० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून या प्रकल्पासाठीही ३५४५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभिकरण, महापालिकेच्या वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकरता चार्जिंग स्टेशन, माटुंगा व मुंबा देवी येथे होणारी रोबा कार पार्किंगच्या कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अजोय मेहता महापालिका आयुक्त असताना त्यांनी प्रथम पेडिस्ट्रीयन फर्स्ट या नावाची पहिली संकल्प अर्थसंकल्पातून जाहीर केली होती. परंतु आता तब्बल पाच ते आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा चहल यांना ही संकल्पना घेऊन यावे लागले. त्यामुळे मुंबईतील पदपथ या चालण्यायोग्य नाहीत हे आता प्रशासनाला पटले असावे असे बोलले जात आहे.