सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीच्या नेमणुकीबाबत कॉलेजियमने केलेल्या शिफारसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला 5 नवे न्यायमूर्ती मिळाले असून आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 32 झाली आहे.
( हेही वाचा : चीनचा ‘स्पाय बलून’ अमेरिकेने फोडला! F22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा )
न्यायमूर्ती नेमणुकीसंदर्भात कॉलेजियमच्या शिफारसी मंजूर करत सरकारने न्या. पी.व्ही. संजय कुमार (मणिपूर) न्या. पंकज मित्तल (राजस्थान) न्या अमानुल्ला, न्या. संजय करोल (पाटणा) आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा (प्रयागराज) यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीचे वॉरंट जारी केलेय. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये शिफारस केलेल्या पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीला विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. न्या. संजय किशन कौल आणि न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने केंद्राला 10 दिवसांच्या आत नियुक्त्यांची प्रक्रिया करण्याचा अखेरचा पर्याय (अल्टिमेटम) दिला होता. ऍटर्नी जनरल एन वेंकटरामानी यांनी लवकरच या नियुक्त्या केल्या जातील असे न्यायालयाला सांगितले होते.
कॉलेजियमवरून कार्यकारिणी आणि न्यायपालिका यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरअखेर केंद्राने सर्वोच्च न्यायालयासाठी पाच न्यायाधीशांच्या नावांना मंजुरी दिली आहे. या पाच न्यायाधीशांच्या पदोन्नतीसाठी कॉलेजियमच्या प्रलंबित शिफारशी रविवारपर्यंत जाहीर केल्या जातील असे सराकरने सांगितले होते. यानंतर आज राष्ट्रपतींनी कॉलेजियमच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. हे सारे न्यायमूर्ती सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झाली आहे. उर्वरित 2 शिफारशींवर पुढील आठवड्यात नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community