म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

223

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (४ फेब्रुवारी) होती. मात्र, यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांदेखील अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर या घरांची सोडत ७ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.

( हेही वाचा : राष्ट्रीय उद्यानातील सिंह दर्शनाला जाळ्यांच्या चुकीच्या डिझाईनचा अडथळा )

…म्हणून दिली मुदतवाढ 

म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी (३१ जानेवारी) घेण्यात आला होता. त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५९१५ सदनिकांसाठी सोडत होत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्यअंतर्गत २९२५ घरे उपलब्ध आहेत. यंदा प्रथमच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तसेच आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या अर्जांची छाननीदेखील ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्र जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. काहींना अर्ज करूनही अजून प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.