राज्यात लोककला महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर चार दिवसांचा पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘चिपळूणच्या लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई- गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे. कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाइल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळतील. कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफील्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल.’
(हेही वाचा – लिंगाडे नशीबाचे धनी; अमरावतीच्या जागेवर पराभूत का झालो याचं आत्मचिंतन करणार – चंद्रशेखर बावनकुळे)
यावेळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या भारतरत्नांच्या लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचाही समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community