विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी एकहाती विजय संपादन करेल, असे चित्र निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत रंगवले जात असताना प्रत्यक्षात त्यांचा दारुण पराभव झाला. या निकालामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले असले, तरी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा कळीचा ठरल्याने भाजपाला हक्काचे मतदारसंघ गमवावे लागले आहेत.
जानेवारी महिन्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र, महाविकास आघाडीने त्याला सुरुंग लावत विजयश्री संपादन केली. त्याशिवाय, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सर्व ताकद पणाला लावूनही भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय रोखता आला नाही. जुन्या पेन्शनच्या रूपाने शिक्षकांमध्ये असलेली खदखद भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
या निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी निवृत्ती वेतन योजना हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला. हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास नकार देत आकडेवारी सादर केली होती. या भाषणाची चित्रफीतच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी समाजमाध्यमातून प्रसारित केली. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा मुद्दा तापदायक ठरू लागल्याने आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करीत सरकार जुनी योजना लागू करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले. मात्र त्यास बराच उशीर झाला आणि जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यावर प्रचारात भर देणाऱ्या उमेदवारांना यश मिळाले.
राज्यात पेन्शन प्राप्त सुमारे पाच लाख शिक्षक आहेत. त्यातील किमान दोन लाख शिक्षक हे जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. या शिक्षकांनी सरकार विरोधात मतदान केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा मुद्दा भाजप व शिंदे गटाला त्रासदायक ठरू शकतो, असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
नागपुरात वर्मी घाव
नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेने लढवली. तीनवेळा शिक्षक आमदार राहिलेले नागो गाणार यंदाही विजय मिळवतील, असा विश्वास भाजपाला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या आक्रमक उमेदवारापुढे गाणार यांची मवाळ शैली निष्प्रभ ठरली. जुन्या पेन्शनचा मुद्दा मविआने प्रचारात लावून धरल्याने शिक्षकांनी गाणार यांची साथ सोडत सुधाकर आडबाले यांच्या पारड्यात मते टाकली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरात पराभवाची नामुष्की ओढवल्याने भाजपावर हा वर्मी घाव असल्याचे बोलले जात आहे.
अमरावतीत घोडे कुठे अडले?
अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार तथा माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील सहज विजयी होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. गेल्या दोन निवडणुका रणजित पाटील यांनी सहज जिंकल्या होत्या. यावेळी राणा दाम्पत्य, प्रहारचे बच्चू कडू, तसेच शिंदे गटाची ताकद सोबत असतानाही पाटील पराभूत झाले. अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने साथ दिली.
औरंगाबाद शिक्षक मतदासंघांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनीही आपल्या कामाच्या जोरावर चौकार ठोकला. काळे यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला. औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा यापूर्वी भाजप पुरस्कृत शिक्षक परिषद लढवत होती. यावेळी भाजपने स्वतः ही निवडणूक लढविली. मात्र, ते विक्रम काळे यांना रोखू शकले नाहीत.
कोकणात आयात उमेदवारामुळे दिलासा
कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या फेरीतच विजय मिळविला असला, तरी त्यांच्याकडे आयात उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. म्हात्रे हे आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते शिंदे गटात दाखल झाले. मात्र, कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांना भाजपाने जवळ केले. या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आपले मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यामुळे भाजपाला शिंदे गटाच्या ताकदीच्या जोरावर येथे सहज विजय मिळविता आला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सत्यजित तांबे कोणाचे?
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी झाली. अपक्ष सत्यजित तांबे यांनी सहज विजय मिळविला. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने तिकीट देऊनही ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरणे टाळले. त्यांचे पुत्र युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून कॉंग्रेसला धक्का दिला. त्यामुळे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणे महाविकास आघाडीला भाग पडले. मात्र, विजयी झालेले सत्यजित तांबे कुणाचे, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community