मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचा खर्च तब्बल ३४ हजार कोटींनी वाढला गेला आहे. चालू आर्थिक वर्षात ३१ प्रकल्पांवर ९० हजार ३०४ कोटींचा खर्च अपेक्षित मानला जात होता, परंतु आगामी अर्थसंकल्पामध्ये ८ नवीन कामांसाठी १ लाख २४ हजार १२९ कोटींचा खर्च अपेक्षित मानला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पांवरील खर्च तब्बल ३३ हजार ८२० कोटींनी वाढल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने चालू आर्थिक वर्षांत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, पिंजाळ प्रकल्प, सायकल ट्रॅक, मोठ्या जलवाहिन्यांची कामे, चर विहरित खुली मलवाहिनी टाकणे, मिठी नदी प्रकल्पांची कामे, भगवती रुग्णालय, एम.टी. अगरवाल, कुपर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय इमारत, अॅक्वर्थ रुग्णालय, टाटा कंपाऊंड हॉस्टेल इमारत,आश्रय योजना, शीव रुग्णालय, टोपीवाला मंडई, नायर दंत रुग्णालय विस्तारित इमारत, कांदिवली सेंटीनरी रुग्णालय, शीव कोळीवाडा वसतीगृह, क्रॉफर्ड मार्केट, शिरोडकर मंडई, नद्यांचे पुनर्रुज्जीव, सिध्दार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास आणि भांडुप स्पेशालिटी रुग्णालयांकरता सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पात एकूण प्रकल्प खर्च ९० हजार ३०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरुन त्यासाठी १७ हजार ९४२ कोटींच्या निधीची तरतूद केली होती.
तर आगामी अर्थसंकल्पात यासर्व प्रकल्पांसह भांडुप संकुल येथील दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण प्रकल्प, दहिसर लिंक रोड ते मिरा रोड भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग, देवनार गाव येथील भूखंडाचा पुनर्विकास, विक्रोळीतील इंजिनिअरींग हब, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, ओशिवरा प्रसुतीगृह आणि नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास आदी प्रकल्पांची कामे समाविष्ठ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च १ लाख २४ हजार १२९ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला आहे. तर या प्रकल्पांच्या खर्चासाठी आगामी अर्थसंकल्पात १९ हजार ७६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण ८९ हजार कोटींच्या मुदतठेवी असून त्यातील ५१ हजार १४७ कोटी रुपयांचा निधी राखीव आहे. हा निधी पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खर्च होऊ शकतो. तर ३७ हजार १५६ कोटी रुपयांचा निधी हा बांधील दायित्वापोटी असून हा निधी खर्च करू शकत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांवर केवळ ५१ हजार १४७ कोटी रुपयांचा निधीच खर्च केला जाऊ शकतो.
त्यामुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी अपेक्षित असलेल्या १ लाख २४ हजार १२९ कोटी रुपयांच्या तुलनेत सध्या राखीव निधीतील पैसा हा अपुरा असून महापालिकेला हाती घेतलेले प्रकल्पांसाठी महसुली उत्पन्न वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई मलनि:सारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा खर्च तब्बल १२ हजार कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पासाठी चालू आर्थिक वर्षात १५ हजार ६९३ कोटींचा खर्च अपेक्षित होता, तर आगामी अर्थसंकल्पात याचा अपेक्षित खर्च २७ हजार ३०९ कोटींचा गृहीत धरला आहे. तर भांडुप मल्टीस्पेशालिटीच खर्च ४६४ कोटी रुपयांच्या तुलनेत ७४४ कोटी रुपये गृहीत धरला आहे. तर दहिसर ते मिरा भाईदर पर्यंतच्या पुलाच्या बांधकामाचा ३५५० कोटींचा खर्च वाढला गेला आहे. विशेष म्हणजे जिथे अर्थसंकल्प अ,ब व ईचे दायित्व हे चालू वर्षात १५ हजार ६१४ कोटींचे गृहीत धरले होते, तिथे हा खर्च २६ हजार७५४ कोटी रुपयांचे गृहीत धरले आहे, तर अर्थसंकल्प ग चे दायित्व जिथे ४हजार कोटी रुपये होते, तिथे ५ हजार६७६ कोटी रुपये गृहीत धरले आहे.
( हेही वाचा: डिजिटल स्ट्राईक: 232 चिनी अॅप्सवर भारताने घातली बंदी )
‘हे’ प्रकल्प वाढले
- भांडुप संकुल येथील दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण प्रकल्प( प्रकल्पांचा एकूण खर्च : ५२३९ कोटी रुपये, तरतूद : ३५० कोटी रुपये)
- दहिसर लिंक रोड ते मिरा रोड भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग( प्रकल्पांचा एकूण खर्च : ३५५० कोटी रुपये, तरतूद : २२ कोटी रुपये)
- देवनार गाव येथील भूखंडाचा पुनर्विकास( प्रकल्पांचा एकूण खर्च :१०४१ कोटी रुपये, तरतूद : २२१ कोटी रुपये)
- विक्रोळीतील इंजिनिअरींग हब( प्रकल्पांचा एकूण खर्च : ३८६ कोटी रुपये, तरतूद :१ कोटी रुपये)
- गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय( प्रकल्पांचा एकूण खर्च : ३८० कोटी रुपये, तरतूद : ५० कोटी रुपये)
- ओशिवरा प्रसुतीगृह पुनर्विकास ( प्रकल्पांचा एकूण खर्च: १३२ कोटी रुपये, तरतूद : ९.५कोटी रुपये)
- नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास (प्रकल्पांचा एकूण खर्च: १३० कोटी रुपये, तरतूद : १२ कोटी रुपये)