वरळीतील ‘त्या’ आमदाराला मंत्रिपदाची ऑफर? आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी रणनीती

136

‘एकनाथ शिंदे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढून दाखवावे, ते कसे जिंकतात ते पाहतोच’, असे आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्याची गंभीर दखल शिंदे गटाने घेतली असून, २०२४ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तिचाच एक भाग म्हणून वरळीतील एका विधानपरिषद आमदाराला थेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचे कळते.

( हेही वाचा : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ )

२०१९ च्या विधानसभेला उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत उतरविण्यात आले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक लढविणारे ते ठाकरे घराण्यातील पाहिले सदस्य ठरले. ते निवडूनही आले. पण, त्यांचा राजकारणातील पदार्पणाचा मार्ग सोपा करण्यासाठी दोन मातब्बर नेत्यांचे करिअर पणाला लावण्यात आले. सुनील शिंदे आणि सचिन अहिर, हे ते दोन नेते. सुनील शिंदे त्यावेळी वरळीचे आमदार होते, आदित्य यांच्यासाठी त्यांनी तिकिटाचा मोह आवरला.

पण, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले सचिन अहिर मैदानात उतरल्यास दगाफटका होऊ शकतो, हे हेरून अहिर यांनाच गळाला लावण्यात आले. परिणामी दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर फेकले गेल्याने आदित्य सहजपणे निवडून आले. त्यानंतर ते कॅबिनेट मंत्रीही झाले. सुनील शिंदे आणि अहिर यांनी केलेल्या त्यागाच्या बदल्यात त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. पण, आता सत्तांतर झाल्यानंतर परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. कोण कधी साथ सोडेल, याचा विचार करणेही अवघड बनले आहे.

अशा स्थितीत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना निवडणुकीचे आव्हान देत त्यांना ललकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची गंभीर दखल शिंदे गटाने घेतली असून, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या दोन विधानपरिषद आमदारांपैकी एकाला फोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

पडद्यामागे कोणत्या हालचाली?

एकनाथ शिंदे यांना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पडद्यामागे अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. वरळीतील एका विधानपरिषद आमदाराला थेट मंत्रिपदाची (२०२४ मध्ये) ऑफर देण्यात आली आहे. हा आमदार जर शिंदे गटाच्या गळाला लागला, तर आदित्य यांच्यासमोर तुल्यबळ आव्हान निर्माण होईल. शिवाय गेल्या काही वर्षांत भाजपानेही वरळीमध्ये आपली ताकद वाढवल्याने, ही अतिरिक्त कुमक शिंदे गटाच्या उपयोगी येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.